Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 September 2010

कदंबच्या अन्यायग्रस्त चालकांच्या भवितव्याचा फैसला १६ ला होणार

"गोवादूत'ला विशेष धन्यवाद

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - "कदंब'च्या ६७ अन्यायग्रस्त बदली चालकांना सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय १६ सप्टेंबर रोजी घेण्याचे आश्वासन वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिले.त्यामुळे सदर चालकांनी आजपासून (गुरुवार) आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. या चालकांवर झालेल्या अन्यायाचे ठळक वृत्त "गोवादूत'ने प्रसिद्ध केले होते हे येथे उल्लेखनीय.

पाच वर्षे नोकरी केलेल्या "कदंब'च्या बदली चालकांना कायम करण्याचे आश्वासन देऊनही त्याच्या कार्यवाहीबाबत कदंब महामंडळ चालढकल करत असल्याने हे चालक दि. ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार होते. कालच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याचे वृत्त आज "गोवादूत'सह काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल वाहतूक मंत्र्यांनी घेतली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कदंब महामंडळाने सात वर्षांपूर्वी सुमारे २०० चालकांना बदली चालक म्हणून कामावर घेतले. त्यांना सुट्टी न देता त्यांच्याकडून काम करवून घेण्याचा सपाटा सुरूच आहे.
संताप आणि आश्चर्याची बाब म्हणजे कामावर हजर होऊनही अनेक वेळा त्यांना बसवर ड्युटी न केल्याचे कारण देऊन पगार वजा केला जातो. त्यामुळे कंटाळून २०० चालकातील १३३ जनानी नोकरी सोडली. उर्वरित ६७ चालकांनी पुती गावकर यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण श्रम व रोजगार आयुक्ताकडे नेले. तेथे सुनावणी झाली असता कदंब व्यवस्थापनाने ज्या चालकांना पाच वर्षे झाली त्यांना सेवेत कायम करण्याचे लेखी आश्वासन रोजगार आयुक्तांना दिले. मात्र त्याची कार्यवाही केली नाही. म्हणून या चालकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. काल याबाबत बैठक झाली, पण तीत काहीही निर्णय झाला नाही व आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली.
आज श्रम व रोजगार आयुक्त श्रीमती एफ. रॉड्रिग्ज यांच्या कक्षात चालकांचे प्रतिनिधी, कामगार नेते पुती गावकर, कदंबचे कार्मिक व्यवस्थापक विद्याधर हरमलकर व अन्य अधिकाऱ्यांची सुमारे चार तास बैठक झाली. या बैठकीदरम्यान वाहतूक मंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची त्यांना जाणीव करून देण्यात आली. त्यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर बाहेर पत्रकाराशी बोलताना पुती गावकर यानी बैठकीत झालेल्या लेखी निर्णयाची माहिती दिली. यावेळी सर्व ६७ चालक उपस्थित होते. या चालकांनी १६ रोजी वाहतूक मंत्री आम्हांला नक्कीच न्याय देतील अशी आशा व्यक्त केली. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी "गोवादूत'ला खास धन्यवाद दिले.

No comments: