Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 6 September 2010

"सोने व पितळ यातील फरक मतदार जाणतात'

दामू नाईक यांचा फातोर्डावासीयांवर विश्वास

मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : सोने व पितळ यातील फरक ओळखण्याइतपत फातोर्ड्यातील मतदार सुज्ञ आहेत व त्याची प्रचिती गेल्या तीन निवडणुकांतून (२००२ पासून)त्यांनी आणून दिलेली आहे, असे सांगून फातोर्ड्याचे भाजप आमदार दामोदर नाईक यांनी आगामी निवडणुकांतही आपले मतदार हाच पवित्रा घेतील,असा ठाम विश्र्वास या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
सर्वत्र दामू म्हणून परिचित असलेले फातोर्ड्याचेे आमदार विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यापाठोपाठ खिंड लढविताना दिसत असून, उद्या (सोमवारी) ते आपला वाढदिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, की आपले राजकीय प्रतिस्पर्धी सध्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघात जिवाचा आटापिटा करताना सर्वप्रकारचे साम दाम दंड यांचा अवलंब करीत असले, तरी त्याची आपणाला क्षिती नाही कारण आपला विश्र्वास शेवटी मतदारांवर आहे. राजहंस जसे दुधातून पाणी वेगळे काढतो तशी खडे वेचून बाजूला फेकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे व तीच आपणाला पुरेशी आहे.
दामोदर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार कसेच बधत नाहीत हे पाहून वेगवेगळ्या वस्तू फुकटात वाटून त्यांना मिंधे-लाचार बनविण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यासाठी नाताळ-चतुर्थी सारख्या सणांची वेळ साधून त्यांना फुकटात धान्य, तेल, साखर सारख्या वस्तू फुकटात वाटल्या जात आहेत, त्यामागे कोणताही हेतू नसता तर ठीक होते, पण निवडणुका जवळ येऊन ठेपताच हे औदार्य का फळफळावे, असा सवाल त्यांनी केला. लोकांनी अशा वस्तू नाकारून आपल्या सणांसाठी आपणाला कोणाचीही भीक नको हे दाखवून द्यायला हवे, ते म्हणाले.
आपण मतदारसंघात तीन कार्यकाळात केलेले काम लोकांसमोर आहे, त्यासाठी जाहिरातबाजीची वा स्टंटबाजीची गरज नाही, असे सांगून काही मंडळी त्यासाठी करीत असलेल्या आटापिट्याची त्यांनी कीव केली. आपले काम पारदर्शी आहे, आपणाला कोणत्याही बेकायदा मार्गाचा अवलंब करावा लागला नाही की आपणावर कोणतेही खटले पण दाखल झालेले नाहीत, पण काहींनी तोच राजमार्ग बनविला आहे व ते त्याचे पोटतिडकीने समर्थन पण करीत आहेत. उच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे पोचलेल्यांनीच हा आव आणावा हीच खरी शोकांतिका आहे. या लोकांचे प्रत्येक व्यवहारच बेकायदा आहेत, त्यात त्यांची "मास्टरी' आहे असे त्यांनी नमूद केले.
फातोर्ड्याच्या कल्याणाचा आव आणून स्थापन झालेल्या अशाच एका संघटनेचा उल्लेख त्यांनी केला व सांगितले, की असलेली लागवडीखालील शेती बुजवून तेथे कॉंक्रीटचे जंगल उभारणारे आता फातोर्डात ग्रीनरी उभारण्याच्या गोष्टी करीत आहेत पण त्यासाठी जमीन कुठे उपलब्ध आहे ते सांगण्याचे मात्र टाळतात. फातोर्डाच्या विकासकामांबाबत कोणत्याही मंचावर त्यांच्याशी आमने -सामने चर्चा करण्याची आपली तयारी आहे व तसे आव्हान आपण त्यांना अनेकदा दिलेले आहे पण ती हिंमत नसल्यामुळेच ती मंडळी दुसऱ्याच्या नथींतून तीर मारण्याचा उपद्व्याप करीत आहेत. पण आपणाला त्याची पर्वा नाही , कारण आपले मतदार राजहंसाची भूमिका बजावणारे आहेत असे त्यांनी आत्मविश्र्वासाने सांगितले.

No comments: