मुख्यमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
ड्रगप्रकरण गुंडाळले जाणार!
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग माफिया प्रकरणात गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची हवाच काढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार यानीव बेनाईम ऊर्फ "अटाला' बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसांना जबाबदार धरता येणार नाही, अशी "क्लीन चीट' आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पोलिसांना दिली. गृहमंत्री रवी नाईक यांनी आपल्या अहवालात अटाला बेपत्ता झाल्यामागे कोणालाही जबाबदार धरलेले नाही. त्यांनी सादर केलेला अहवाल आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे अटाला बेपत्ता झाला यासाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही, कारण तो पोलिस कोठडीत नव्हता, असेही श्री. कामत म्हणाले. ते आज मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलत होते.
"एकदा जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी नजर ठेवायला पाहिजे असे नाही. न्यायालयाने त्याला जामीन दिल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. याची माहितीही आम्ही न्यायालयाला दिली आहे,' असे श्री. कामत यांनी पुढे सांगितले. अनेक पोलिस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती गुंतलेल्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या "अटाला' याचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही काढण्यात आली आहे. सध्या पोलिस अटाला याची प्रेयसी व मॉडेल लकी फार्महाऊस हिची जबानी घेण्यासाठी तिची वाट पाहिली जात आहे. लकी फार्महाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येणार होती. मात्र ती आली नसल्यास गोवा पोलिस स्विडनला जाणार असल्याचे गृहमंत्री नाईक यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप गोवा पोलिस स्विडनला जाण्याची कोणतीही तयारी झालेली नाही. या प्रकरणात गृहमंत्री नाईक व त्यांचा मुलगा रॉय नाईक यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.
Tuesday, 7 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment