Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 7 September 2010

चार विदेशींच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करणार

लवकरच संगणक शिक्षकांची नियुक्ती

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - "फेमा' कायद्याचे उल्लंघन करून विदेशी नागरिकांनी गोव्यात घेतलेल्या चार विदेशी नागरिकांच्या जमिनींची कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. राज्यात विदेशी लोकांनी "फेमा' कायद्याचे उल्लंघन करून जमिनी विकत घेतलेल्या सर्व तक्रारी अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवण्यात आल्या होत्या. त्यातील ४ विदेशी नागरिकाच्या जमिनींच्या जप्तीचे आदेश संचालनालयाने काढल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली. मोरजी येथील तीन तर हणजूण येथे चार विदेशी नागरिकांकडून एकूण २२ हजार चौरस मीटरचा भूखंड पुन्हा सरकार आपल्या ताब्यात घेणार असल्याचे ते म्हणाले. ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारी तसेच सरकारी अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात कायमस्वरूपी संगणक शिक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांना ती पूर्ण होताच ४१३ संगणक शिक्षकांना भरती करून घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाने अंतर्गत कामगारांना दिले जाणारे वेतनही ११० रुपयांवरून १५७ रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. कामत यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून संगणक शिक्षकांची सेवत कायम करण्याची मागणी केली जात होती. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या शिक्षकांना विविध शाळांत कंत्राट पद्धतीवर नेमले होते. त्यानंतर या शिक्षकांनी सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची ही मागणी प्रलंबित होती. यासाठी अनेक आंदोलनेही करण्यात आली होती. अखेर या शिक्षकांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला असून ४१३ शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण होताच संगणक शिक्षकाच्या मुलाखतींना सुरुवात केली जाणार आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ११० रुपये वेतन असल्याने त्यासाठी गोव्यात कामगार मिळणे कठीण होत होते. त्यामुळे यात वाढ करण्यात आली असून यापुढे १५७ रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे, पत्रकारांच्या निवृत्ती वेतनातही वाढ करण्यात आली असून ते ४ हजार एवढे करण्यात आले आहे. यापूर्वी ते २ हजार रुपये दरमहा दिले जात होते. तसेच राज्य सरकारतर्फे १२ लाख रुपये निवृत्तिवेतन योजनेसाठी जमा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल खात्याने वाळपई पालिका मंडळाला संकुल उभारणीसाठी ६ हजार ५८० चौरस मीटर जागा दिली आहे. त्यासाठी पालिकेने महसूल खात्याला १३ लाख १६ हजार रुपये दिले आहेत. तसेच याच ठिकाणी स्टेट ऑफ आर्ट "आयटीआय' उभारण्यासाठी २० हजार ५६२ चौरस मीटर जागा हस्त कारागीर प्रशिक्षण संचालनालयाला ताब्यात दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
म्हापसा येथील आझिलो इस्पितळाच्या नव्या इमारतीत स्त्री रोग व बाल रुग्ण विभाग येत्या ९ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मेडिसीन विभाग आणि स्कॅनिंग विभागही सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने मागण्या संदर्भात अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत त्यावर तोडगा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

No comments: