Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 September 2010

'त्या' टोळीतील आणखी एक फरारी गुंड गजाआड

-आता शोध सूत्रधाराचा
-आंतरराज्यीय टोळीशी संबंध
-अनेक गुन्ह्यांत सहभाग

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कळंगुट येथे अटक करण्यात आलेल्या टोळीचा चौथा साथीदार मायकल फर्नांडिस याच्या मुसक्या आज कोलवा येथे आवळण्यात आल्या. कळंगुट येथे गेस्ट हाउसवर त्याला अटक करण्यासाठी छापा टाकला असता तेथून पळून जाण्यात तो काल यशस्वी ठरला होता. शिवोली येथून फरारी झालेला मायकल याला आज सायंकाळी कोलवा समुद्र किनाऱ्यावरील एका झोपडीत लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक करण्यात आली, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. राज्यात संघटित गुन्हे वाढत असल्याने पोलिसही खडबडून जागे झाले आहेत. मायकल हा या टोळीचा प्रमुख असून तो सूत्रधार जेनिटो याचा उजवा हात म्हणून ओळखला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या टोळीची पाळेमुळे खोलवर रुजल्याची माहिती हाती लागल्याने त्या सर्वांचा प्रमुख जेनिटो याला ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
दरम्यान, काल रात्री पोलिसांनी याच टोळीचा आणखी एक साथीदार संदीप पुजारी याला अटक केली. जेनिटो याच्यासाठी आम्ही काम करीत असल्याची माहिती या टोळक्याने दिल्याचे कळंगुट पोलिसांनी सांगितले. तसेच या टोळीचे हैदराबाद व बंगळूर येथील गुंडाच्या टोळीशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.
काल अटक करण्यात आलेला मूळ नागालॅंड येथील यान जॉन यांन हाही जेनिटो याचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचा अनेक प्रकरणात त्याचा सहभाग आहे. केपे येथे धेंपो खाणीवरील कामगारांचे वेतनाचे लाखो रुपये घेऊन जाताना लुटलेल्या प्रकरणात तसेच जुने गोवे येथे विनय फडते याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यातही याच जॉन यांन याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरोडा आणि हत्या करण्यासाठी लागणारी हत्यारे जेनिटो पुरवीत होता, असेही या टोळीने उघड केल्याने आता पोलिसांनी जेनिटो याला ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
तुरुंगात जॉन यांग याच्याशी मैत्री...
खाणीवर घेऊन जाणारी लाखो रुपयांची रक्कम लुटलेल्या प्रकरणात जॉन यांग हा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. यावेळी त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते तेथे त्याची जेनिटो याच्याशी मैत्री झाली. जेनिटो या शिरदोण येथे झालेल्या टोळीयुद्धात दुहेरी खून प्रकरणात कोठडीत होता. जेनिटो या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर त्यानेच जॉन यांग याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
पोलिसांशी साटेलोटे...
जेनिटो याचे काही पोलिसांशी घनिष्ठ संबंध असल्याचेही बोलले जाते. जुने गोवे येथे विनय फडते याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात जेनिटो याच्या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले होते. परंतु, त्याला ताब्यात घेण्यासाठी बरीच टाळाटाळ करण्यात आली होती. एका प्रकरणात एका पोलिस शिपायावर कारवाई होण्याची पाळी आली होती, अशी माहिती सूत्राने दिली. संघटित टोळी चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात येत नसल्यानेही पोलिस या टोळ्यांना मोठी संधी देत असल्याचे बोलले जात आहे.
१६ ते ३५वर्षांचे तरुण सहभागी
ऍड. आयरिश रोड्रिगीस याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही टोळी नावारूपाला आली होती. त्यावेळी या टोळीतील अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शिरदोण येथे झालेल्या टोळी युद्धानंतरही हे टोळी गाजली होती. यात अनेक तरुणांची भरती करण्यात आली असून त्यांना मौजमजा करण्यासाठी लागणारी सर्व सुविधा पुरवल्या जातात. तसेच त्याच्या बदल्या त्यांच्याकडून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करून घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments: