Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 September 2010

गाडीतील लाखाची रक्कम पळविली

वास्को, दि. ८ (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या चोरी प्रकरणांमुळे वास्कोतील जनता पूर्णपणे हैराण झालेली असतानाच आज दिवसाढवळ्या भर वस्तीत रस्त्यावर उभी असलेल्या गाडीतून अज्ञात चोरट्याने एक लाखाची रोख रक्कम लंपास केल्याने पुन्हा येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चिखली येथील गणेश कुमार या नागरिकाने "आंध्र बॅंक' शाखेतून दीड लाखाची रक्कम काढून त्यापैकी एक लाख आपल्या गाडीत ठेवून तो पंधरा मिनिटांसाठी कुठेतरी गेला असता त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून अज्ञाताने सदर पैसे लंपास केले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.४५ च्या सुमारास सदर घटना घडली. गणेशकुमार या कंत्राटदाराने दीड लाखाची रक्कम काढल्यानंतर त्यातील पन्नास हजार त्यांनी त्यांच्याशी नोकरी करणाऱ्या एका युवतीला दिले, राहिलेली एक लाखाची रक्कम त्यांनी आपल्या "मारुती ८००' गाडीत (क्रः जीए ०२ ए ८२९४) ठेवून नंतर तेे वास्कोच्या ट्युरिस्ट हॉस्टेलसमोर असलेल्या "कॅनरा बॅंक' शाखेसमोर पोचला व त्याने आपली गाडी समोरच उभी करून ठेवली. पंधरा मिनिटांनी ते परतले असता त्यांना त्यांच्या गाडीला काही प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले. त्यांनी गाडी उघडून आपली एक लाखाची रक्कम आहे काय हे पाहिले असता सदर रक्कम गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. गणेश यांनी वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. वास्को पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

No comments: