Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 August 2010

"शेतकऱ्यांचा राजा'

जेम्स लेनच्या चौथ्या प्रकरणाचे शीर्षक The Patriot : Political Readings of Hindu Identity in the Tales of Shivaji 1869-2001 असे आहे. हा काळ शिवाजी महाराजांचे आधुनिक स्वरूपात चरित्रलेखन करण्याचा आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील संशोधकांच्या चार पिढ्यांनी तसेच भारतातील इतर प्रांतांमधील अनेक संशोधकांनी आपल्या परिश्रमांनी शिवचरित्र आधुनिक संशोधनाच्या कार्यपद्धतीवर तोलून लिहिण्याचे प्रयत्न केले. त्यांनी घेतलेले श्रम, छानून काढलेले पुरावे, अनेक पूर्वीच्या गोष्टींना आधार न मिळाल्याने त्यांना वगळून अत्यंत वास्तव असणाऱ्या आधारांना घेऊन लिहिलेली शिवचरित्रे त्याने अर्ध्या वाक्यात मोडीत काढली आहेत. त्यांना तो राजकीय दृष्टिकोनातून सांगितलेल्या गोष्टी (Tales) म्हणतो. म्हणजे मराठी इतिहासकारांनी लिहिलेल्या त्या गप्पागोष्टी आणि जेम्स लिहील तो इतिहास - विश्वसनीय इतिहास - असा अर्थ होतो.
आधुनिक काळात म्हणजे तो नमूद करतो त्या १८६९ - २००१ च्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या शिवचरित्रांना (retelling असे तो लिहितो) पाश्चात्य संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. Thus from the early nineteenth century to the present, any retelling of the tales of Shivaji would reflect some awareness of European Culture and power, just as previous accounts reflect an Islamicate context,..... so the regional hero Shivaji began to be portrayed as a national hero well before the British handed over control of the sub-continent to an independent India and Pakistan (पृ. ६३)
लेनने इतिहास लेखन आणि इतिहास मिमांसा यात पूर्वी दिल्याप्रमाणे गल्लत केली आहे. तो म. ज्योतिबा फुलेंनी १८६९ मध्ये लिहिलेल्या पोवाड्यापासून सुरुवात करतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिवचरित्र लिखाणामागचा इतिहासकार आणि समिक्षकांचा हेतू ब्रिटीश राज्याविरुद्ध प्रतिकार उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या रुपात राष्ट्रीय नेत्याचे अथवा देशभक्ताचे चित्र रंगविणे व त्यातून लोकांना प्रेरणा देणे हा होता. म. फुलेंनी शिवाजी महाराजांना बहुजन समाजाचा नायक या स्वरूपात पाहिले - 'It is important to keep in mind the context of nineteenth century caste politics while reading Phule's portrayal of Shivaji as a low-cast hero. (पृ. ६५). छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात इतकी विविध कामे केली, इतक्या प्रकारच्या समाजांसाठी चांगली कामे केली की त्या त्या समाज घटकांना ते आपलेसे वाटले तर नवल वाटायला नको. लेन त्याच्या पुस्तकातच शेतकरी आंदोलनामुळे प्रसिद्धीस आलेल्या शरद जोशी, अनिल गोटे आणि राजीव बसेर्गकर यांच्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या "शेतकऱ्यांचा राजा शिवाजी'चा संदर्भ देतो. साहजिकच आहे; महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याबाबत, जंगल संपत्ती वाचविण्याबाबत तसेच मोहिमेदरम्यान रयतेचे धान्य इतर सुलतानी फौजांप्रमाणे लुटून न घेता पैसे देऊन विकत घेण्याचे आदेश दिले. तत्कालीन रयतेला त्यातून स्वस्थता आणि शाश्वती मिळाली. आधुनिक भारत आणि इन्डिया यात झालेल्या फरकामुळे काही वर्षांपूर्वी शेतकरी नेते श्री शरद जोशी, अनिल गोटे इत्यादींनी शेतमालाच्या भावाविषयी आंदोलन उभारताना शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांविषयीच्या उदार धोरणांना समोर ठेऊन त्यांना "शेतकऱ्यांचा राजा' स्वरूपात पाहिले, म्हणजे इतिहास बदलला नाही तर त्यातील एक उपेक्षित दृष्टिकोन समोर आला असेच म्हणता येईल.
या पुढची पायरी म्हणजे मुसलमान समाजाने शिवाजी महाराजांना त्यांचा नेता, त्यांचा रक्षणकर्ता या दृष्टिने पाहणे. सध्याचे व्होटबॅंकेचे राजकारण पाहता अफजलखान हा काही मुसलमानांना जवळचा वाटतो. त्याच्या व शिवाजी महाराजांच्या भेटीच्या चित्रावरून सांगलीत दंगल उसळते. मात्र पुढे जाऊन शिवाजी महाराजांच्या नावे मते मिळणार असतील तर तेही मुस्लिम लोक महाराजांना आदर्श सर्वधर्मसमभावी आणि सेक्युलर राजा मानण्यास पुढे येतील.

No comments: