Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 10 August 2010

मळा येथे कामगाराचा खून

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेल्या खुनांची मालिका सुरूच असून आज पणजी येथील चार खांब - मळा (मानस) येथे असलेल्या पुष्पराज सॉ मिलमध्ये काम करणाऱ्या शांताराम गावकर (४७) या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून खून करण्यात आला. मयत शांताराम हा मूळ केसरलॉक - कर्नाटक येथे राहणारा असून संशयित आरोपी गोविंद गिरी (३६) याच्यावर भा. दं. सं ३०२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
संशयित आरोपी काल रात्रीपासून गायब झाला असल्याने त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. गोविंद हा मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. तो पहाटे चारपर्यंत याच मिलमध्ये बसून होता, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
सॉ मिलचे मालक पराग करमली यांनी आज सकाळी मयत शांताराम याच्या खोलीच्या बाहेर रक्त सांडल्याचे पाहिल्यावर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन शांताराम याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडले असता आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शांतारामचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी काही पुरावेही जप्त केले आहेत.
अधिक माहितीनुसार, शांताराम आणि गोविंद हे दोघेही या सॉ मिलवर कामाला होते. दि. ७ ऑगस्ट रोजी सर्व कामगारांना वेतन मिळाले होते. त्यामुळे मिलवरील काही कामगार गावी गेले होते तर शांताराम व गोविंद हे दोघेच थांबले होते. या मिलच्या मागच्या बाजूलाच दोघांचीही राहण्याची खोली आहे. सायंकाळी ४ वाजता या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. काल रात्री दोघेही दारूच्या नशेत होते. त्यानंतर रात्री ९ वाजता दोघांचेही कडाक्याचे भांडण सुरू होते हे त्या मिलवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहिले होते. भांडण हातघाईवर आल्याने याची माहिती त्यांनी रात्रीच मिलचे मालक पराग यांना दिली होती. आज सकाळी पराग मिलवर आला असता त्याला शांताराम याच्या खोलीच्या दरवाजाला बाहेर कुलूप असल्याचे आढळून आले. खोलीच्या बाहेर रक्ताचे शिंतोडेही दिसल्याने त्यांनी त्वरित पणजी पोलिसांना अवगत केले. गोविंद हा शांताराम राहत असलेल्या बाजूच्या खोलीत राहत होता. दिवसा या मिलवर तो काम करायचा तर रात्रीच्या वेळी कांपाल येथील एका "एटीएम'मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होता.
मयत शांताराम याच्या डोक्याला गंभीर जखमा झालेल्या असून त्याला जमिनीवर आपटून मारण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतदेहाच्या बाजूला एक चाकूही पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. परंतु, त्याचा अधिक उपयोग झाला नाही. मात्र पोलिसी श्वान काल रात्री दोघेही ज्या बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते तिथपर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

No comments: