Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 11 August 2010

साहित्यिक पुरावे नाकारणारा जेम्स

प्रथम बखरीत दिलेल्या भाषणासंबंधाने विचार करता येईल. पाश्चात्य राष्ट्रांच्या इतिहासातही अनेक सेनापतींची रणांगणावर दिलेली भाषणे प्रसिद्ध आहेत. रणांगणाच्या धुमाळीत ती तशीच्या तशी लिहून घेण्यास काय तेव्हा लेखनीस लेखण्या सरसावून तयार होते. ती भाषणे इतिहासात शिकवली जातातच ना? मग चिटणीस बखरीतील भाषणाचे वावडे का असावे. ते भाषण अर्थातच कोणी संशोधक पुरावा म्हणून सादर करत नाही. आतापर्यंत वाचलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रांमधून त्यांनी शाहिस्तेखानाच्या छावणीकडे निघण्यापूर्वी महाराजांनी प्रेरणादायी भारून टाकणारे, घणाघाती इ. विशेषणयुक्त भाषण दिल्याचा उल्लेख कोणीही केलेला नाही. तो या भोट संशोधकाने तारे तोडण्यासाठी केला.
भारतीय जनमानसाला उपभोगशून्य स्वामीच्या व्यक्तीत्वाचे आकर्षण प्राचीन काळापासून आहे. राजा रंतिदेव, राजर्षि जनक, श्रीराम, हर्षवर्धन इ. पासून तो शिवाजी महाराजांपर्यंत असे अनेक राजे भारतवर्षात झालेत. स्वत: महाराज त्याला अपवाद नव्हते.
हा लोकविलक्षण राजा वयाच्या १८ व्या वर्षी "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे', असे पत्रात लिहितो, त्याची इश्वरेच्छेला आत्मसर्मण करण्याची भावना त्याच वयात आहे. तो प्रतापगडावर श्री भवानीच्या मूर्ती स्थापनेच्या वेळी भोपेपण स्वीकारतो आणि श्री शैलमच्या दर्शनाच्या वेळी स्वत:चे शिरकमल अर्पण करण्याची त्याला उर्मी येते. असा हा उपभोगशून्य स्वामी आहे. त्याच्या तोंडी चरित्र लेखकाने फकिरी स्वीकारल्याचे वाक्य घातले तर ते वावगे ठरू नये. लेन म्हणतो, he assumes a temporary but meaningful role of the renouncer (पृ ५१) सन्यस्त वृत्तीत जगणारे ते व्यक्तिमत्व होतेच. Here the story is chose to history असेच म्हणता येईल.
शिवाजी महाराज, तुकाराम महाराज व समर्थ रामदास
या विषयावर बरेच लिहून झाले आहे. लेनच्या बाबतीत त्याचे अर्धवट आकलन त्याने पृ. ५२ वर दिलेल्या दोन पूर्ण परिच्छेदांवरून लक्षात येते.
तुकाराम महाराज इ.स. १६४९ मध्ये निर्वाण पावले. त्यावेळी महाराजांचे वय २१-२२ चे होते. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. महाराजांचे निवासस्थान पुष्यासच होते. त्यांची नजर त्या मुलखात सर्वदूर फिरत होती. त्यांच्या स्वभावात उपजतच धार्मिकता होती. अशावेळी लाल महालापासून तास दीड तासाच्या घोडदौडीच्या अंतरावर असलेल्या देहू गावात वारकऱ्यांना आपल्या अमृतमय वाणीने, रसाळ अभंगांनी भारून टाकणारा हा महात्मा त्यांच्या नजरेतून सुटला असेल असे होणेच शक्य नाही. फार नियमितपणे नव्हे पण कधी कधी तरी तरूण शिवाजी राजानी तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलेच असावे. भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा। असा अध्यात्माचा अर्थ लावणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तरूण शिवाजी महाराजांच्या मनातील कल्पना स्पष्ट करण्यास कारणीभूत ठरले असतील असेच म्हणावे लागते. अर्थातच स्वराज्याचा विस्तार मर्यादित होता त्यामुळे सनदा, पत्रे इ. लिहिण्याची वेळ नव्हती. शिवाय पुणे, देहू अंतर घर आंगणासारखे होते. त्यामुळे राजे काही तासांत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन येऊ शकत होते. ती भेट त्याकाळी नोंदण्यालायक घटना ठरली नव्हती. त्यामुळे या दोन श्रेष्ठ व्यक्तींची भेट झालीच नव्हती असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
शिवसमर्थ भेटीच्या संदर्भात विजय देशमुख यांनी दिलेला पर्याय स्वीकारार्ह वाटतो. त्यांच्या मते २१ एप्रिल १६५९ रोजी शिवसमर्थ भेट झाली. (शककर्ते शिवराय, खं १ पृ ३२२) लेनने या चरित्राचा उल्लेखच केलेला नाही. तो जर पुण्याला अनेकदा आला असेल आणि २००३ पूर्वी २० वर्षे म्ह. १९८३ पासून शिवचरित्राचा अभ्यास करत असेल तर विजय देशमुख यांच्या १९८० साली प्रसिद्ध झालेल्या द्विखंडात्मक शककर्ते शिवराय पाहिल्याशिवाय त्याचा अभ्यास अर्धवटच राहिला असे म्हणता येते. त्या पुस्तकाचा निर्देश संदर्भ ग्रंथ सूचितही नाही.
जेम्स लेनने एक धडधडीत खोटे विधान केले आहे. तो लिहितो No literary text of seventeenth century associates Shivaji with either of these saints, although Ramdas writes passages that seem to be written as advice to the king (दासबोध १८.६ ) some scholars produce letters and deeds to show that the king patronised Ramdas and /or accepted him as his guru'.
(पृ ५२) एका फटक्यात त्याने इतिहास संशोधकंानी स्विकारलेल्या सनदा कागदपत्रे नाकारली आहेत. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या भेटींच्या संदर्भात ते का असू शकत नाहीत याचे विवेचन या पूर्वी केलेले आहे. समर्थांच्या बाबतीत तसे लिहिणे म्हणजे त्याने जाणून बुजून केलेला तर्कदृष्टपणा आहे. समर्थांनी महाराजांना अनुक्षुन लिहिलेले "निच्छयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू ।। त्यात स्पष्ट उल्लेख आहे की "तुमचे देसी वास्तव्य केले। परंन्तु वर्तमान नाही घेतले।' ही ओवीतर समर्थांनी शिवाजी महाराजांना उद्देशूनच लिहिली आहे.
समर्थांनी शिवाजी महाराजांना श्रीमन्त योगी, शिवकल्याण राजा अशा विशेषणांनी संबोधले आहे. आणि महाराजांच्या महानिर्वाणानंतर शंभू राजांना पाठविलेल्या त्या सुप्रसिध्द पत्रात शिवरायाचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी।। असे वर्णन त्या दोघांमध्ये अंतरंगीचे प्रेम असल्याशिवायच वर्णन केले गेले? हे सर्व साहित्यिक पुरावे लेन एका फटक्यात खोटे ठरवितो, नाकारतो.
क्रमशः

No comments: