पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातून महाराष्ट्रात तस्करी करता यावी यासाठी पर्वरी येथील एका फ्लॅटमध्ये साठवून ठेवलेल्या मद्य साठ्यावर अबकारी खात्याने आज छापा टाकून सुमारे ७० हजार रुपयांचे मद्य जप्त केले. येथे गोव्यात उत्पादित होणाऱ्या दारूचे खोके बदलून त्याची महाराष्ट्रातील विविध भागांत तस्करी केली जात होती, अशी माहिती मिळाली आहे. हे खोके बदलण्याच्या कामाला असलेल्या तीन कामगारांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले तर, ही तस्करी करणारा मुकेश सचदेव याच्यावर अबकारी खात्याने गुन्हा नोंद केला आहे.
मुकेश सचदेव याचा पणजी बाजारात "सीडी' विकण्याचा व्यवसाय असून तो पर्वरी येथे एका इमारतीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. याच ठिकाणी त्याने हा मद्याचा साठा करून ठेवला होता. गोव्यात बनणाऱ्या व्हिस्की आणि ब्रॅंडीचे १२० खोके या ठिकाणी आढळून आले. तसेच, बिस्कीट व चॉकलेटचे रिकामे खोकेही निरीक्षकांना मिळाले आहेत. या रिकाम्या खोक्यांत या दारूच्या बाटल्या भरून त्यांची तस्करी केली जात होती, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा धंदा सुरू होता, अशी माहिती हाती आली आहे.
याचा मुख्य सूत्रधार अबकारी खात्याच्या हाती आलेला नाही. मुकेश सचदेव हा बाहेरगावी असल्याने तो गोव्यात येताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सदर छापा बार्देश तालुक्यातील अबकारी निरीक्षक रमण फातर्पेकर व निरीक्षक महेश कोरगावकर यांनी टाकल्याची माहिती मिळाली आहे.
Thursday, 12 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment