Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 August 2010

दोषींवर कठोर कारवाई

राष्ट्रकुल भ्रष्टाचारप्रकरणी पंतप्रधान कडाडले
नवी दिल्ली, दि. १४ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भ्रष्टाचारात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (शनिवार) आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी क्रीडामंत्री एम. एस. गिल, नगरविकास मंत्री एस. जयपाल रेड्डी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, सुरेश कलमाडी तसेच राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या गैरव्यवहाराची माहिती घेऊन, चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, स्पर्धेच्या ठिकाणाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान भेट देणाची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि स्पर्धेच्या आयोजनात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असल्याने शुक्रवारी (ता. १३) कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीत चर्चा झाली होती. या चर्चेत मनमोहनसिंग आणि युपीएच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.

No comments: