Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 August 2010

'म्हापसा अर्बन'च्या निवडणुकीला आव्हान

आपा तेली व यशवंत गवंडळकर
यांची सहकार निबंधकांकडे याचिका

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची १८ जुलै २०१० रोजी झालेली निवडणूक हा केवळ फार्स होता. या निवडणुकीत सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली व त्यामुळे ही निवडणूक बेकायदा ठरवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका आपा तेली व यशवंत गवंडळकर यांनी सहकार निबंधकांकडे आज दाखल केली.
म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची दि. १८ जुलै २०१० रोजी निवडणूक झाली असता ऍड. रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ऍड. खलप यांच्या विरोधी गटातील सर्व उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते व त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली होती. या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निवडणूक अधिकारी आर. एन. देसाई यांच्या भूमिकेवरच याचिकादारांनी संशय व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी लादण्यात आलेल्या अटी व नियम केवळ आपल्या मर्जीतील उमेदवारांना पूरक ठराव्यात व विरोधकांचे अर्ज फेटाळण्यात यावेत या उद्देशानेच तयार करण्यात आले, असेही या याचिकेत म्हटले आहे.
मुळात १८ रोजीच्या निवडणुकीसाठीचे अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया १६ रोजी सुरू करण्यात आली. या अर्जासोबत अमर्याद माहिती मागवण्यात आल्याने अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. पण ऍड. खलप यांच्या गटाला मात्र मुदतीपूर्वीच अर्ज बहाल करण्यात आल्याचा संशयही या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. संचालक मंडळासाठी दाखल झालेल्या २२ अर्जांपैकी १३ अर्ज पडताळणी करण्यापूर्वीच फेटाळण्यात आले व ऍड. खलप यांचे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच "हायजॅक' करण्यात आली व त्यातूनच विद्यमान अध्यक्ष ऍड. खलप यांनी आपले पॅनल बिनविरोध निवडून आणले, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, संचालक मंडळासाठी सादर करण्यात आलेले १३ अर्ज कोणत्या निकषांवर फेटाळण्यात आले, याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागवली असता त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवडून आलेल्या संचालकांनी कोणती कागदपत्रे सादर केली याचा तपशील मागवला असता त्यासाठी अधिक वेळ लागेल, असे सांगण्यात आल्याने व या निवडणुकीला आव्हान देण्याची मुदत संपत असल्याने ही अतिरिक्त माहिती कालांतराने या याचिकेला जोडण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. या निवडणुकीची संपूर्ण कागदपत्रे मागवण्यात यावीत. तत्पूर्वी, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून बॅंकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात यावी व नव्याने संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, अशी याचना यावेळी करण्यात आली आहे. याचिकादारांच्यावतीने ऍड. देवेंद्र गवंडळकर व ऍड. निनाद कामत यांनी वकालतनामा सादर केला आहे.

No comments: