७० हजारांचा माल जप्त
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - वजन आणि मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज मळा पणजी येथील राजेश्वरी एजन्सी या दुकानावर छापा टाकून ७० हजार रुपयांचा बेकायदा माल जप्त केला. यात वॉटर फिल्टर, जी. गंगा प्रेशर कुकर, सूर्य सुरक्षा एलपीजी रबर ट्यूब, एलपीजी गॅस स्टोव्ह, मिक्सर, निर्लोन नॉन स्टिक तवा, एलपीजी ऍडाप्टर गॅस लाईटर इत्यादी सुमारे ३२१पेक्षा अधिक उत्पादनांचा समावेश असल्याची माहिती वजन आणि मापे खात्याचे नियंत्रक एम. एन. नाईक यांनी दिली.
आज सकाळी वजन आणि मापे कार्यालयाचे नियंत्रक एम. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक नियंत्रक प्रसाद शिरोडकर आणि निरीक्षक पंकज नाईक यांनी ही कारवाई केली. छाप्यात पकडण्यात आलेल्या उत्पादनांवर वजन आणि मापे १९७७ कायद्यानुसार उत्पादनाचा दर, ते तयार करणाऱ्या कंपनीचे नाव व पत्ता, त्यांच्या निर्मितीची तारीख आणि वर्ष तसेच अन्य आवश्यक बाबी छापल्या गेल्या नसल्याचे आढळल्याने कायदेशीर कारवाई करून सदर उत्पादनांची विक्री बंद करण्याची ताकीद देण्यात आली. तसेच काही जुन्या उत्पादनांवर नवीन दरांची लेबले चिकटवल्याचे निदर्शनास आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोव्यात बोगस माल विकण्याचे प्रकार परप्रांतीय विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात होत असून आज पकडण्यात आलेला राजेश्वरी एजन्सीचा मालक हा मूळ राजस्थानचा असून तो गोव्यात कित्येक वर्षे असा बेकायदा व्यापार करत आहे. असा बनावट माल विकणाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
नियंत्रक नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वजन आणि मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल २००९ ते जून २०१० या काळात विविध प्रकारची एकूण ४७० प्रकरणे हाताळली असून दंड स्वरूपात ८०३३०० एवढी रक्कम गोळा करण्यात आली आहे; तसेच याच काळात ३४५६२५१ एवढा महसूल गोळा करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Wednesday, 11 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment