Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 8 August 2010

लेह ढगफुटीची बळीची संख्या १३०; बेपत्ता ६००

लेह, दि. ७ - लडाख क्षेत्रातील लेह येथे शुक्रवारी ढगफुटीची घटना घडून त्यात घरांच्या व इमारतींच्या मलब्याखाली तसेच चिखलाखाली दबून असलेल्या आणखी काही जणांचे मृतदेह आज आढळून आल्याने मृतांची संख्या १३० झाली आहे, तर बेपत्ता लोकांची संख्या ६०० सांगितली जात आहे. या भागातील अनेक गावे या पुराच्या तडाख्यात सापडली असून तेथील जीवित हानीबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याने बळी संख्या ५०० च्या घरातही जाऊ शकते, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. किती लोक बेपत्ता झाले आहेत, याचाही आकडा निश्चितपणे कळलेला नसला तरी तो ६०० वरही असू शकतो.
लेह विभागाचे पोलिस प्रमुख कुलदीप खोडा यांनी सांगितले की, आतापर्यंत १३० मृतदेह हाती लागली असून कमीतकमी ३७० लोक जखमी झालेे आहेत. बेपत्ता लोकांची संख्या किती आहे, हे तर अद्याप समजलेले नाही.
दरम्यान, भारतीय वायुदलाच्या एका मालवाहू विमान ब्लॅंकेट, कोरडे अन्न, औषधी व इतर गरजू वस्तू घेऊन येथे दाखल झाले, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतले असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
सर्वाधिक फटका हा चोगलुमसूर या खेड्याला बसला असून ढगफुटीनंतर आलेल्या पुरात हे संपूर्ण खेडेच वाहून गेले आहे. यातून बचावलेल्यांचा शोध घेतला जात आहे. येथून १३ किमी अंतरावरील चोगलुमसूर खेड्यातील २०० लोकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. एका कॉन्ट्रॅक्टरने एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगितले की, माझ्या येथे काम करणारे जवळपास १५० मजूर बेपत्ता आहेत. या सर्वांना शयॉंग खेड्यात उतरविले होते. इंडस नदीच्या किनाऱ्यावर मजुरांची ही कॉलनी वसविण्यात आली होती. या नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या जवळपास सर्व झोपड्या वाहून गेल्या आहेत. लष्कराने या कॉंन्ट्रॅक्टरकडे स्थानिक व बाहेर गावाहून आणण्यात आलेेल्या मजुरांची नेमकी संख्या सांगा असे म्हटले आहे. तुरतूक या भागात लष्करालाही या पुराचा फटका बसला असून चांग ला पासजवळ असलेल्या काही खेड्यांनाही पुराचा फटका बसला आहे.
केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला आज सकाळी येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांचे दोन केंद्रीय सहकारी गुलाम नबी आझाद व पृथ्वीराज चव्हाणही दाखल झाले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी कालच पूरग्रस्त भागांचा दौरा करू न परिस्थितीची जातीने पहाणी केली आहे. मधल्या काळात जोेरदार पावसाने मदत कार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु आता पुन्हा मदत कार्य सुरू झाले आहे. पोलिस, इंडो-तिबेटियन पोलिस दल व नागरी प्रशासन मदत कार्यात गुंतलेलेे आहे. या लोकांनी या भागातच आपली शिबिरे थाटली आहेत. ३०० जखमींपैकी अनेकांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. ३१ बेपत्ता जवानांचा अद्याप शोध लागलेला नाही.
ढगफुटीनंतर आलेल्या पुरात जे मजूर वाचले त्यातील बहुतांश मजूर हे छत्तीसगडमधील आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या येथील कामावर हे मजूर काम करीत आहेत. अनेक जखमींना येथील लष्कराच्या दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यातील ७० जखमी हे छत्तीसगडमधील आहेत, असे लष्करी अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
लष्कराचे तीन अधिकारी तसेच बिहार रेजिमंेंटच्या इतर ३० जवानांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, लेह येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारगिल, चंडीगड व उधमपूर येथून भारतीय वायुदलाची काही विमाने व हेलिकॉप्टर लेहकडे जाण्यासाठी तयार आहेत.
राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी या घटनेेवर तीव्र दु:ख व्यक्त केलेे आहे तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधानांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

No comments: