खंडणी प्रकरण भोवले
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- गोवा राज्य शिवसेनेचे राज्य प्रमुख उपेंद्र गांवकर व उप राज्यप्रमुख उमेश साळगावकर यांना खंडणीप्रकरणी पोलिसांनी अटक करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य शिवसेना कार्यकारिणीच बरखास्त करून उमेश साळगावकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा आदेश जारी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी फॅक्सद्वारे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या आदेशात म्हटल्याप्रमाणे राज्यातील शिवसेना संघटनेचे कामकाज पाहण्यासाठी अस्थायी समिती जाहीर करण्यात आली आहे. या अस्थायी समितीचे निमंत्रक म्हणून माजी गोवा राज्य शिवसेना प्रमुख रमेश नाईक असतील. दक्षिण गोवा शिवसेना प्रमुख दामू नाईक, संदीप वेंगुर्लेकर, फिलिप डिसोझा, राजेश मराठे, शांताराम पराडकर हे या अस्थायी समितीचे सदस्य असतील, असेही या आदेशात कळवण्यात आले आहे.
पर्वरी येथील हॉटेल मॅजेस्टिकच्या व्यवस्थापनाकडून खंडणी वसूल करण्यासाठी गेलेल्या उमेश साळगावकर यांना सीसी कॅमेऱ्यात खंडणी वसूल करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गोवा राज्य शिवसेना प्रमुख उपेंद्र गावकर यांनाही पाचारण करून त्यांच्या सहमतीनेच ही खंडणी वसूल केली जात होती, याचाही उलगडा झाल्याने या दोघांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर झाला असला तरी या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातही उमटल्याने त्याची गंभीर दखल शिवसेना प्रमुखांना घेणे भाग पडले व त्याचे पर्यवसान म्हणूनच संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, उपेंद्र गांवकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हा प्रकार आपल्या विरोधकांनी रचलेल्या राजकीय कुभांडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. राज्यातील ड्रग व्यवहाराची "सीबीआय' चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याने आपल्याला फसवण्यासाठीही हा कट रचला जाणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, यासंबंधी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख मिलिंद तुळसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवल्याचे जाणवले. या आदेशात उमेश साळगावकर यांच्या हकालपट्टीचा थेट उल्लेख करण्यात आला असला तरी उपेंद्र गावकर यांची राज्य प्रमुख पदावरून हकालपट्टी किंवा त्यांना शिवसेनेतून काढून टाकल्याचा कोणताही उल्लेख या आदेशात नसल्याने त्याबाबत मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
Friday, 13 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment