Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 12 August 2010

मिकींच्या पासपोर्ट अर्जास गुन्हा अन्वेषणाचा तीव्र विरोध

मडगाव, दि.११ (प्रतिनिधी): माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी येथील सत्र न्यायालयात आपला पासपोर्ट परत मिळावा व आपणाला अमेरिकेत जाण्यास परवानगी मिळावी म्हणून दाखल केलेल्या अर्जाला नादिया तोरादो मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाने तीव्र विरोध केला आहे.
जप्त केलेला आपला पासपोर्ट परत मिळावा तसेच आपणास गोव्याबाहेर जाण्यास अनुमती मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज मिकी यांच्या वतीने त्यांचे वकील आनाक्लात व्हिएगश यांनी काल येथील सत्र न्यायालयात दाखल केल्यावर आज गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडणारा अर्ज न्यायालयाला सादर केला. त्यात अर्जदारावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत व त्या प्रकरणांचा तपास अद्याप सुरू असताना त्याचा पासपोर्ट परत करणे व त्याला विदेशात जाण्यास अनुमती देणे संपूर्णतः अनुचित ठरेल; त्याने अशा परवानगीचा गैरफायदा घेऊन दडी मारली तर या प्रकरणाचे काय? त्याला परत कसे आणणार? असे सवाल अर्जांत करण्यात आले असून जामिनावर त्याला मुक्त करताना न्यायालयाने घातलेल्या अटींमागे विशिष्ट हेतू तसेच अर्जदाराची पार्श्र्वभूमीही होती याकडे लक्ष वेधले आहे.
न्या. बी. पी. देशपांडे यांनी या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी उद्याची तारीख निश्र्चित केली आहे. नादिया तोरादो मृत्युप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने गोठविलेली सर्व बॅंक खाती खुली करण्याचा आदेश प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी दिल्यानंतर मिकींच्या वतीने हा पासपोर्ट व विदेशवारीची अनुमती मागणारा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

No comments: