Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 13 August 2010

दरोडेखोरांची टोळी पकडली

राय व केपे दरोड्यांचा छडा - चोरीचा माल हस्तगत

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) - गेल्या २२ जुलै रोजी राय येथे झालेल्या १.२० लाखांच्या धाडसी चोरी प्रकरणातील म्होरक्यासह पाच जणांना मायणा - कुडतरी पोलिसांनी तर एकाला मडगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी तिघे सामील असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दरोडा म्हणून नोंद केली आहे.
दरम्यान, याच टोळीचा दोन महिन्यांपूर्वी आक्रामळ - केपे येथे एका पिकअप व्हॅनवर घातलेल्या दरोड्यात हात असल्याचेही त्यातून उघडकीस आले आहे. त्यातील इतरांचा माग लागला असून त्यांना कोणत्याही क्षणी जेरबंद केले जाईल, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी आज येथे दिली.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व मायणा- कुडतरीचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कामगिरीचे संपूर्ण श्रेय उमेश गावकर यांचे मार्गदर्शन आणि सिद्धांत शिरोडकर व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक नवलेश देसाई व सूरज सामंत यांना दिले. त्यांनी दिवसरात्र घेतलेल्या अविरत परिश्रमांमुळेच ही टोळी जेरबंद झाल्याचे ते म्हणाले.
राय दरोडा प्रकरणी अटक केलेल्यांत मुख्य आरोपी व्हॅली डिकॉस्ता (तिळामळ, केपे), जॉन्सन वर्गीस (गोठणीमड्डी, केपे), नरेंद्र पाटील व अलीम कित्तूर (बाबूनगरी, मडगाव) व नागराज कलगटकर (मूळ बेळगाव व सध्या मुक्काम केपे) यांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नागराज हा व्यवसायाने सोनार आहे. मडगाव पोलिसांनी मांडोप - नावेली येथे अटक केलेल्याचे नाव सुलेमान हजरत नडार असे आहे.
आंतोनेत कार्दोज यांच्या दमण - राय येथील घरात सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यावेळी घरात ती व तिची विवाहित मुलगी मारीया जुझे पेद्रू फर्नांडिस होती. चौघे अनोळखी इसम बळजबरीने घरात घुसले. आगंतुकांनी पिस्तूल व सुरीचा धाक घालून आंतोनेतकडून कपाटाच्या किल्ल्या मिळविल्या व नंतर तिला एका खोलीत बंद करून साधारण १.२० लाखाचा ऐवज लुटला होता. नंतर आंघोळ करत असलेली मारीया बाहेर आली त्यावेळी तिलाही खोलीत बंद केले होते व ते पसार झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता त्यांचाच दूरचा नातेवाईक असलेला व्हॅली डिकॉस्ता ही घटना घडली त्या दिवशी त्या परिसरात असल्याचे आढळून आले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानेच दिलेल्या माहितीनुसार बाकीच्या चौघांना ताब्यात घेतले गेले. एवढेच नव्हे तर चोरीचा बहुतेक मालही वितळवलेल्या स्थितीत जप्त करण्यात आला आहे, असे ऍलन डीसा यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राय येथील सदर महिलांनी चौघे घरात शिरल्याची माहिती दिल्यावरून या प्रकरणाची नोंद चोरी म्हणून केली गेली होती. पण ताब्यात घेतलेल्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार या प्रकरणात सहा जण सहभागी होते व त्यामुळेच आता हे प्रकरण दरोडा म्हणून नोंदवले गेले आहे. चौघे घरात शिरले होते, एकटा रस्त्यावर गाडीत बसून होता तर दुसरा दरवाजाजवळ थांबून बाहेर लक्ष ठेवून होता. ते गाडी घेऊनच आले होते व गाडीतूनच पसार झाले. गाडीचा क्रमांक उघडकीस आलेला असून तो सर्वत्र कळविण्यात आला आहे. मुख्य म्होरक्या व्हॅली यानेच दरोड्याची आखणी केली व इतरांनी जमवाजमव केली. पण सदर महिला ओळखेल म्हणून तो घरात शिरला नाही तर गाडीतच बसून राहिला. त्यांनी दरोड्यासाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला, पण अजून पिस्तूल हाती लागलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
या दरोड्यात सामील झालेल्या अन्य दोघांना जरी अजून पकडलेले नसले तरी त्यांच्या मागावर पोलिस आहेत असे सांगून त्यांची नावे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. सर्वजण २० ते २५ वयोगटांतील आहेत.
या आरोपींचा तपास चालू असतानाच १५ जून रोजी तिळामळ - केपे येथे सायंकाळी ४.३० वा. नावेलीतील एक मद्यविक्री कॅंटर ट्रक अडवून झालेल्या लुटीत याच टोळीचा हात असल्याचे आढळून आले व त्यांनी त्या कामासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या. ती वाटमारी करणारे सहा जण होते अशी तक्रार पिकअप चालकाने केली होती. त्यांनी सुरीचाच धाक घालून व आतील लोकांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ती वाटमारी केली होती व दोन लाखांची रक्कम पळविली होती. प्रत्यक्षात जरी ही घटना सायंकाळी ४.३० वा. घडलेली असली तरी त्याची तक्रार ६ वा. नोंद झाली होती. या दरोड्यात गुंतलेलेच राय दरोड्यात असावेत व परिसरातील अशा प्रकारच्या प्रकरणांतही त्यांचा हात असावा, असा पोलिसांचा कयास असून त्या दृष्टीने तपास चालू आहे असे त्यांनी सांगितले. याच मद्य विक्रेत्याला गेल्या वर्षी नावेली येथे बॅंकेच्या दारातच लुटले गेले होते. त्यातही हीच टोळी असू शकते काय, असे विचारता त्या दृष्टीने तपास चालू असल्याचे ते म्हणाले.
मायणा - कुडतरी पोलिसांनी गेल्या जून-जुलै दरम्यान चांगली कामगिरी बजावताना अनेक गुन्हेगारांना गजाआड केल्याचे प्रशस्तिपत्र त्यांनी दिले.

No comments: