पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - मेरशी येथील "अपना घर'मधून पाच अल्पवयीन मुलांनी आज सायंकाळी पळ काढला असून याविषयीची तक्रार जुने गोवे पोलिस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. यातील एकाचे वय १४ तर अन्य चौघांचे वय १२ वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. आज सायंकाळी ४ च्या दरम्यान
कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून या मुलांनी पलायन केले, असे "अपना घर'च्या अधीक्षकांचे म्हणणे आहे. पळालेल्या मुलांची नावे रात्री उशिरापर्यंत जुने गोवे पोलिस स्थानकात उपलब्ध नव्हती. दरम्यान, अपना घरमध्ये ठेवण्यात येत असलेल्या अल्पवयीन मुलांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे आरोप होत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक मुलांनी तेथून पलायन केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच अपना घरच्या इमारतीची जी दुर्दशा झाली आहे तो मुद्दा न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. विविध गुन्हेगारी प्रकरणात सापडणाऱ्या अल्पवयीन मुलांना याठिकाणी ठेवण्यात येते. त्यांच्यावर सुरू असलेले खटले दीर्घकाळ चालतात. तोवर त्यांना तेथेच ठेवले जाते. तसेच यात अनेक परप्रांतीय मुले असल्याने त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पोचवण्यासाठी कोणताही त्रास घेतला जात नाही, असे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील एका न्यायमूर्तींनी दिले आहेत. सरकार मात्र या प्रश्नावर उदासीन असल्याचेच चित्र दिसून येते.
या पळून गेलेल्या मुलांचा शोध घेण्याचे काम जुने गोवे पोलिसांनी सुरू केले आहे. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक रमेश शिरोडकर करीत आहेत.
Sunday, 8 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment