Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 10 August 2010

बेकायदा आर्किटेक्चर महाविद्यालयावर 'सीबीआय'चा छापा

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): 'ऑल इंडिया कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर'चे अध्यक्ष डॉ. विजयकृष्ण साहनी हे गोव्यात बेकायदा रीतीने चालवत असलेल्या "ए. आय. डी. आय' या आर्किटेक्चर महाविद्यालयावर दिल्ली येथील केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाने आज छापा टाकून महाविद्यालयाला टाळे ठोकले. तसेच डॉ. साहनी यांच्या बाणावली येथील घरावरही छापा टाकून अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. डॉ. साहनी मडगाव - फोंडा रस्त्यावर हे महाविद्यालय गेल्या २००५ सालापासून चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुद्द "ऑल इंडिया कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर'च्या अध्यक्षांनीच सरकारी नियम धाब्यावर बसवून गोव्यात सुरू केलेल्या या महाविद्यालयावर अखेर आज कारवाई करण्यात आली. गोवा सरकारलाही याची माहिती असूनही त्यांना हे महाविद्यालय बंद करण्यास अपयश आले होते. त्यामुळे हा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही पोहोचला होता. त्यावेळी आपल्याकडे सर्व कागदपत्रे व सरकारी दाखले असल्याचा दावा या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने खंडपीठात केला होता.
डॉ. साहनी यांचे हे गोव्यातील महाविद्यालय केंद्र सरकारने तसेच "यूजीसी'ने काळ्या यादीत टाकले होते. तरीही २००५पासून हे महाविद्यालय गोव्यात दिमाखात सुरूच होते. दिल्ली येथून आलेल्या "सीबीआय'च्या विशेष पथकाने हा छापा टाकला तर त्याला गोव्यातील 'सीबीआय'च्या शाखेने मदत केली.
दरम्यान, देशभरात अशा बेकायदा महाविद्यालयांवर छापा टाकण्याचे सत्र सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. साहनी यांना अद्याप अटक झालेली नसली तरी, अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती देण्यात आली.

No comments: