आज शिवशाहिरांचे नव्वदीत पदार्पण
पुणे, दि. १३ : श्रीमद्भगवद्गीतेचा आशय "ये हृदयीचे ते हृदयी ' या ब्रीदाने श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्र्वरीतून पोहोचविला, त्या पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील राष्ट्रनिर्मितीचा आशय सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शिवचरित्र पुन्हा नव्याने लिहायला घेत आहोत. हे शिवचरित्र तीन हजार पानांचे असेल. तो एकत्रही मोठा ग्रंथ असेल व एक एक प्रकरणे अशी स्वतंत्र पुस्तकेही असतील, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करण्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शिवाजी महाराजांनी येथे प्रथम राष्ट्रवाद हा विषय मांडला. कदाचित त्यांनी तो तीन हजार पानाच्या ग्रंथातून लिहिला नसेल; पण नंतर स्वामी विवेकानंद, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांनी तो पुढे चालवला. हा मूळचाच विषय अधिक स्पष्टपणे मांडण्यात येणार आहे. मुलांना एवढे मोठे चरित्र चालणार नसेल व तानाजी, अफजलखान, शाहिस्तेखान असे विषय आवडणार असतील तर तीही पुस्तके तयार असतील किंवा मोठे पुस्तकही तयार असेल. आजपर्यंत मी लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकांच्या नऊ लाख प्रती गेल्या साठ वर्षात वाचकांच्या हातात आहेत. नवे पुस्तकही वाचकांना अधिक आवडेल.
"पण हे पुस्तक लिहिण्यास एक अडचण आहे, असे सांगताना ते म्हणाले, गेली अनेक वर्षे माझ्यावर प्रेमाचा अत्याचार सुरू आहे. तो थांबला तर आणि तरच हे काम होईल. तो अत्याचार म्हणजे निरनिराळ्या लोकांच्या सत्कारापासून ते प्रकाशन समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे. अशा कार्यक्रमातून एक एक दिवस जातो. परगावी असेल तर प्रवासाचा वेळ आणि श्रमही मोजावे लागतात. त्या ऐवजी जर माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांनी जर माझे ऐकून घेतले तर हे चरित्र निश्र्चित लवकरात लवकर तयार होईल.
सध्या सुरू असलेल्या बाजीराव मस्तानी या मालिकेबाबत तुमचे मत काय, असे विचारता ते म्हणाले, ती चांगल्या अभ्यासाने तयार केली आहे. मला जाणवलेली बाब म्हणजे मूळ इतिहासात मस्तानीवर बाजीराव पेशवे यांची पत्नी काशी ही जिवापाड प्रेम करते आणि हे मस्तानीला माहीत असते. वरील मालिकेत काशी ही मस्तानीचा सवतीमत्सर करताना दिसते. पण काही मुद्दे हे असे चालायचेच.
बाबासाहेबांच्या पर्वती पायथ्याला असलेल्या पुरंदरे वाड्यात आज सायंकाळी उद्याच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. बाबासाहेबांच्या अमृतमहोत्सवाच्या म्हणजे पंचाहत्तरीच्या वेळेस बाबासाहेबांना सख्खा भाऊ मानणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिलेली महालक्ष्मीची अडीच किलोची चांदीची मूर्ती उद्या मुख्य महालात ठेवून त्याची पूजा करण्यात येणार आहे. त्या पूजेची तयारी सुरू होती.
नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना मानसिक स्थिती कशी आहे, असे विचारता ते म्हणाले, व्यक्तिगत पातळीवर म्हणाल तर अतिशय समाधानी वाटते आहे. जे मनाशी ठरविले ते या महाराष्ट्रातील जनतेने गोड करून घेतले. या मातीला राष्ट्रवादाचा पीळ देणाऱ्या त्या महापुरुषाचे चरित्र उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पुस्तकाच्या स्वरूपात पोहोचविण्याचे ध्येय तरुणपणातच कधी तरी उराशी बांधले गेले. आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण मी त्यासाठीच दिला. "जाणता राजा' हा कार्यक्रमही तो संदेश पोहोचविण्याच्या दृष्टिकोनाचाच भाग होता. त्याचेही स्वागत चांगले झाले. पण समाजाची स्थिती म्हणाल तर मन विषण्ण होते. काल परवाच आसामची मंडळी आली होती. तेथे जिहादी, नक्षली, माओवादी आणि मिशनरी यांनी ज्या पद्धतीने आक्रमण सुरू केले आहे, त्यामुळे तेथे सामान्य माणसाला सुरक्षित राहणे अशक्य झाले आहे. यापूर्वी इजिप्त, बॅबिलॉन, तुर्कस्तान, इराण या देशांतील स्थानिक संस्कृती पूर्णपणे नष्टप्राय झाल्या. आपलीही तशीच गत होईल काय असे वाटू लागले आहे; कारण ज्या राज्यकर्त्यांनी त्याबाबत अतिआवश्यक सावधगिरी पाळावयाची ते सारे काहीच न करताना दिसत आहेत. त्या विचाराने रात्र रात्र झोप नसते. त्यासाठी अजूनही काही जमले तर करण्याचा विचार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment