Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 12 August 2010

ऍन्डरसन भारताबाहेर जाण्यास नरसिंह राव हेच जबाबदार!

अर्जुनसिंग यांचे खळबळजनक विधान
नवी दिल्ली, दि. ११ : भोपाळ दुर्घटनेनंतर भारतातून पलायन केलेले युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरन ऍन्डरसन यांना तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांच्या सूचनेवरूनच जाऊ देण्यात आले असावे, असे वक्तव्य आज मध्य प्रदेशचे त्यावेळचे (१९८४) मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी केले आहे. या बाबतीत प्रथमच अर्जुनसिंग यांनी आज राज्यसभेत मौन सोडले.मात्र, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना या प्रकरणात त्यांनी "क्लीन चीट' दिली आहे.
आज राज्यसभेत भोपाळ दुर्घटनेवरील चर्चेच्या वेळी अर्जुनसिंग यांनी सविस्तर निवेदन करताना नरसिंह राव यांच्यावरच सारे खापर फोडले. त्यावेळी दिल्ली येथून गृहमंत्रालयाकडून वारंवार सूचना येत होत्या व त्यात ऍन्डरसन यांना जामीन मिळण्यावर भर देण्यात येत होता असे आपल्याला मुख्य सचिवांनी त्यावेळी सांगितले होते, असे अर्जुनसिंग म्हणाले. अर्थात त्यांचा रोख नरसिंह राव यांच्यावरच होता.
नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास मंत्री असताना अर्जुनसिंग यांचे त्यांच्याशी चांगले संबंध नव्हते. या पार्श्वभूमीवर बोलताना अर्जुनसिंग यांनी पुढे सांगितले की, ऍन्डरसन यांना अटक करून त्याची जबानी नोंद करण्याचा आदेश आपण दिला होता; कारण गरज पडल्यास त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करता आले असते. ६ डिसेंबर १९८४ रोजी ऍन्डरसन यांना अटक करून आपण यासंबंधात राजीव गांधी यांना माहितीही दिली होती. तथापि, त्यानंतर दोन दिवस ते यासंबंधात काहीच बोलले नाहीत. त्यांनी ऍन्डरसनची किंवा त्यांच्या विरोधात बाजूही घेतली नाही. त्या पदावरील व्यक्तीबद्दल कोणताही संशय घेणे अयोग्य ठरेल, अशी पुस्ती अर्जुनसिंग यांनी जोडली.
भोपाळमधील वायू दुर्घटनाप्रकरणी काही अधिकाऱ्यांना अलीकडे सौम्य शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ऍन्डरसन यांनी सुटकेनंतर देशातून कसे पलायन केले, याबद्दल चर्चा सुरू झाली आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा त्यात हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. भोपाळ दुर्घटनेला ऍन्डरसनच पूर्णपणे जबाबदार असून त्यांना भारतात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, त्यासाठी ओबामा यांच्या आगामी भारत भेटीत पंतप्रधान डॉ. सिंग यांनी त्यांच्या प्रत्यार्पणासाठी आणि नुकसानभरपाईसाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही अर्जुनसिंग यांनी सांगितले.
३ डिसेंबर १९८४ रोजी वायुगळती झाल्यानंतर ऍन्डरसनना अटक झाली, त्यावेळी राजीव गांधी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात होते, असे सांगून दिल्लीहून गृहमंत्रालयाकडून वारंवार सूचना यायला लागल्या त्यावेळी मी मुख्य सचिवांना सांगितले की, तुम्हांला योग्य वाटेल ते करा, पण ऍन्डरसन यांना अटक करून त्यांची जबानी नोंदवा.
ऍन्डरसन स्वतः या दुर्घटनेस जबाबदार असूनही भोपाळमध्ये आले, त्यामुळे त्यांना अटक होऊन सुटका केल्यावर जनरोषापासून वाचविण्यासाठी सारे उपाय करणे माझे कर्तव्यच होते, असे अर्जुनसिंग यांनी सांगितले. या प्रकरणी मला दोष दिला जात असल्याने मी हे निवेदन करीत असून, अधिक कटुता टाळण्यासाठी तपशील सांगू इच्छित नाही. आता सरकारनेच प्रयत्न करून ऍन्डरसन यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
अर्जुनसिंग यांचे वक्तव्य संशय निर्माण करणारे : जेटली
अर्जुनसिंग यांच्या निवेदनावर समाधानी न झालेले विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, हयात नसलेले तत्कालीन गृहमंत्री व मुख्यसचिव यांच्यावर ठपका ठेवण्यात येत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना ऍन्डरसनबद्दल सहानुभूती नव्हती, तर त्यांनी गृहमंत्रालयाचे का ऐकले? अर्जुनसिंग यांचे निवेदन अधिक संशय निर्माण करणारे आहे.

No comments: