Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 8 August 2010

एका वर्षाच्या "गोंधळा'ला या!

नारायण खराडे
शैलेश तिवरेकर


ती न वर्षांपूर्वी पदविका अभ्यासक्रम निलंबित करून कला अकादमीच्या नाट्यविद्यालयाने सुरू केलेल्या एका वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे आहे ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. "ज्यांना नाटकाची तोंडओळखही नाही' अशांसाठी सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात रेडिओ, व्हिडीओ आणि चित्रपट या माध्यमांचे शिक्षणही अंतर्भूत असल्यामुळे (?)एका वर्षाच्या काळात हे तिन्ही विषय शिकवण्याचा प्रयत्न म्हणजे "एका म्यानात तीन तलवारी ठेवण्याचा अट्टहास' असल्याची प्रतिक्रिया अनुभवी नाट्यकलाकार व्यक्त करीत आहेत, तर तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाबरोबर नाट्यविद्यालय बंद पडून काही जणांना "घरी बसावे' लागू नये यासाठीच हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे नाटक केले गेल्याचा आरोप काही जण खासगीत करतात. हा अभ्यासक्रम तयार करण्यामागे नाट्यविद्यालयाचा दृष्टिकोन काय आहे, हे स्पष्ट होण्यास कला अकादमीने कोणताही मार्ग ठेवलेला नाही. तीन वर्षांत कला अकादमीला या अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका तयार करता आलेली नाहीच पण या अभ्यासक्रमात नेमके काय शिकविले जाईल याबद्दल लेखी स्वरूपात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. रेडिओ माध्यमाचे शिक्षण देण्याचा दावा कला अकादमी करीत असली तरी त्यासाठी कोणत्या साधनसुविधा कला अकादमीकडे आहेत? विद्यार्थ्यांना रेडिओ केंद्रावर नेऊन ही उणीव दूर करायची तर गेल्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना किती वेळा रेडिओ स्टेशनवर नेले गेले? हा खास "प्रॅक्टीकल' कोर्स आहे, असे नाट्यविद्यालयाकडून वारंवार सांगितले जाते. गेल्या तीन वर्षांत रेडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमात विद्यार्थ्यांनी कोणते "प्रॅक्टिकल' काम केले? गोव्यातील लहान सान संस्था गोवा आकाशवाणीवरून नाटिका सादर करतात. कला अकादमीला विद्यार्थ्यांना घेऊन गेल्या तीन वर्षांत फक्त एकच नभोनाट्य सादर करता आले! व्हिडीओच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. व्हिडीओचे अगदी मूलभूत शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधा पुरविणे कला अकादमीला शक्य होत नसल्याचा पुरेपूर अनुभव यापूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रेडिओ आणि व्हिडीओचे कितपत ज्ञान आहे हे तपासून पाहिल्यास या अभ्यासक्रमाचा फुगा फुटू शकतो!
एका वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून त्याची आजपर्यंतची वाटचाल पाहिल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. पहिल्या वर्षी सोळा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, दुसऱ्या वर्षी ही संख्या पाचवर आली आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा सहा. पहिल्या तुकडीने वर्षभरात तब्बल ९ नाटके सादर केली, दुसऱ्या तुकडीने ४ तर तिसऱ्या तुकडीने ५! खरे तर हे आकडेसुद्धा फसवे आहेत. कारण पहिल्या तुकडीने सादर केलेल्या ९ नाटकांत "क्षितिजापर्यंत समुद्र' (महेश एलकुंचवार), चारचौघी (प्रशांत दळवी) ही दोन अंकी नाटके, पाड्या बांयत भांगर पिकला (पुंडलिक नायक), अक्स पहेली (त्रिपुरारी शर्मा) हे दीर्घांक, स्त्रियोपनिषद (सोमनाथ नाईक), भगवद्अज्युकम (बोधायन), मन्या सज्जना (पद्माकर डावरे) या एकांकिका, विदूषक (जी. ए. कुलकर्णी) ही दीर्घ कथा आणि वाडा भवानीआईचा या नाटकाचा एक अंक (फ्रड्रिक लॉर्का) यांचे सादरीकरण झाले. दुसऱ्या वर्षी "चूकभूल द्यावी घ्यावी' आणि "उरुभंग' या एकांकिका, एक तास अवधीचे एक मूकनाट्य आणि "हम आपके हैं कौन' ही मूव्हमेंट नाटिका सादर झाली तर तिसऱ्या वर्षी "गफलत', "उजवाड्टले आयज ना फाल्या' आणि "आयले हड्ड्यार घेतले खड्ड्यार' या एकांकिका, "नो' ही नाटिका आणि एक वीस मिनिटांचे पथनाट्य सादर झाले. ही संख्यात्मक आणि मोठ्या प्रमाणात दर्जात्मक घसरण कोणामुळे झाली? "गेल्या वर्षी आम्ही इंग्रजी प्रॉडक्शन केले' असे संचालिका पद्मश्री जोसलकर अभिमानाने सांगतात, पण ते "प्रॉडक्शन' म्हणजे जेमतेम १५ मिनिटांची नाटिका होती आणि तिचा दर्जा शाळेच्या स्नेहसंमेलनापेक्षाही खालचा होता हे त्या सांगत नाहीत! एका वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण काळात सादर केलेली नाटके स्थानिक वाहिन्यांवरून प्रसारित केल्यास येथे कोणते प्रशिक्षण दिले जाते याचा "साक्षात्कार' गोवेकरांना होऊ शकेल, आणि नाट्यविद्यालयाने तो करवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. ज्या प्रकारची नाटके येथे सादर होऊ लागली आहेत ते पाहता हे शाळा कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही केले जाते, यासाठी खास प्रशिक्षणाची गरज काय, असा प्रश्न पडतो.
गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या एका वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल देण्यात आला आहे. तो कोणत्या निकषांवर तयार करण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्याआधी उत्तीर्ण झालेल्या दोन तुकड्यांचे निकाल अजून देण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी त्यासंबंधी विचारल्यास ते अजून तयार नसल्याचे संचालकांनी सांगितले!
विशेष म्हणजे नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेतलेल्या परंतु नाटकाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला कला अकादमीच्या "रंगमेळ'मध्ये "क' श्रेणी कलाकार म्हणून प्रवेश मिळू शकतो, मात्र एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला तो कितीही अनुभवी व गुणवान असला तरी "क' श्रेणी नाकारली जाते! हा अभ्यासक्रम करून विद्यार्थी आपला कलात्मक दर्जा घालवून बसतात, असे खुद्द कला अकादमी मान्य करते, असेच यावरून समजावे का, हा प्रश्न येथील विद्यार्थ्यांना पडला आहे.

No comments: