नवीन रेशनकार्डधारक अजूनही वंचित
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात केरोसीनचा काळाबाजार सुरू असताना दुसरीकडे केरोसीनची खरोखरच निकड असलेल्या सामान्य रेशनकार्डधारकांना मात्र केरोसीन मिळत नाही, अशा वाढत्या तक्रारी नागरी पुरवठा खात्याकडे येत आहेत.
नागरी पुरवठा खात्यातर्फे गेल्या ऑगस्ट २००९ महिन्यात एका परिपत्रकाव्दारे केरोसीनसाठी रेशनकार्डधारकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र दोन महिन्यांत केरोसीन पुरवठा करू, असे सांगणाऱ्या खात्याकडून आता वर्ष उलटले तरी अद्याप एक थेंबही केरोसीन मिळालेले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नागरी पुरवठा खात्यातर्फे २००९च्या ऑगस्ट महिन्यात एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. रेशनकार्डधारकांनी केरोसीन लाभ मिळवण्यासाठी स्थानिक तलाठ्यांमार्फत आपले नाव जवळच्या केरोसीन विक्रेत्यांकडे नोंद करावे, असे आवाहन त्यात करण्यात आले होते. या आवाहनाला अनुसरून हजारो लोकांनी आपली नावे स्थानिक पंचायतीत तलाठ्यांकडे नोंद केली. या लोकांना दोन महिन्यांत केरोसीन पुरवठा करू, असेही सांगण्यात आले होते. पण आता वर्ष उलटले तरी हा पुरवठा केला नसल्याची माहिती उघड झाली आहे. रेशनकार्डधारक मात्र आपल्या केरोसीन विक्रेत्यांकडे वेळोवेळी चौकशी करतात, पण त्यांचा कोटाच पाठवण्यात आला नसल्याचे उत्तर त्यांना ऐकावे लागते. दरम्यान, यासंबंधी काही नागरिकांनी नागरी पुरवठा खात्याकडे चौकशी केली असता या पुरवठ्याबाबत निश्चित असे काहीही सांगता येणे शक्य नाही, अशी सबब पुढे करून त्यांची बोळवण केली जाते, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत.
हातगाडेवाल्यांकडून काळाबाजार
राज्यात मोठ्या प्रमाणात खात्यातर्फे केरोसीन हातगाडेवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या प्रत्येक हातगाडेवाल्याला १८० लीटर केरोसीन दिले जाते. त्यांना प्रत्येक लीटरमागे केवळ ४५ पैसे मिळतात व त्यामुळे ते उघडपणे या केरोसीनची विक्री काळ्याबाजारात करतात, अशीही खबर आहे. काही टॅंकरवाल्यांकडून तर अशा हातगाडेवाल्यांना २५ रुपये लीटर दराने पैसे मोजले जातात व त्यांच्या नावाचा केरोसीन कोटा मिश्रणासाठी वापरला जातो, अशी खबरही मिळत आहे. दरम्यान, काही लोकांनी आपले वास्तव्य बदलल्यानंतर केरोसीन विक्रेत्यांकडची नोंदणीही अधिकृतपणे बदलली आहे; पण त्यांना नवीन ठिकाणी अद्याप केरोसीन पुरवठा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. नवीन विक्रेता कोटा आला नाही, अशी भाषा करतो तर जुना विक्रेता नाव रद्द केल्याने आपण केरोसीन देऊ शकत नाही, असा सूर लावतो. खात्याकडे यासंबंधी केलेल्या चौकशीअंती हा कोटा जुन्या केरोसीन विक्रेत्यांकडे पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचा अर्थ नावे रद्द होऊनही आलेल्या या केरोसीन कोट्याची काळ्याबाजारात विक्री होत असण्याचीही शक्यता वाढली आहे.
दरम्यान, केरोसीनच्या काळ्याबाजाराचा हा विषय विधानसभेत विरोधकांनी वारंवार उपस्थित करून नागरी पुरवठामंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना धारेवर धरले होते. हा काळाबाजार संपुष्टात आणणार, असा दावा ते करीत असले तरी अद्याप त्यांना त्यात यश मिळालेले नाही. केरोसीनचा काळाबाजार करणारे हे लोक सरकारलाही जुमानत नसल्याने केरोसीनच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या सरकारी अनुदानाचा अपव्यय होत असल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे.
Saturday, 14 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment