पोलिस गस्त वाढविण्याचे सरकारी आश्वासन हवेतच
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) - म्हापशात पोलिसांची गस्त वाढवली जाईल हे सरकारने दिलेले आश्वासन ताजे असतानाच आज (दि. १०) फेअर आल्त येथील "फिनिक्स प्लाझा' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिलीप चोडणकर यांचा फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजारांचा ऐवज पळवला. त्यामुळे म्हापसावासीयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे म्हापसा भागात सुरू असलेल्या चोऱ्या व घरफोड्यांबाबत स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती.
आज सकाळी ९ वाजता फ्लॅटला कुलूप ठोकून चोडणकर कुटुंबीय बाहेर गेले होते. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान ते परत आले असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा असलेला दिसला. फ्लॅटच्या दरवाजाची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. घरमालकांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटे उघडी असलेली त्यांना दिसली. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यानंतर घरातील वस्तूंची पाहणी केली असता सोन्याची व हिऱ्याची अंगठी, चांदीचे पेले, मूर्ती आणि साडेसात हजारांची रोकड लांबवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या ऐवजाची किंमत सुमारे ४८ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
पोलिसांना चोरीची कल्पना दिल्यावर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाच्या साह्याने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो फोल ठरला. पोलिस निरीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करत आहेत.
स्थानिक आमदारांनी म्हापशातील सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर गृहखात्याने म्हापशात अलीकडच्या काळात एखाद दुसरेच चोरीचे प्रकरण झाले असल्याची माहिती देत पोलिस गस्त वाढवण्यात येईल असे आश्वासनही दिले होते. त्या आश्वासनाला आठवडाही लोटलेला नसतानाच चोरट्यांनी पुन्हा आपला हिसका दाखवत गृहखाते व पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
Wednesday, 11 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment