Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 9 August 2010

कायसुवची वनदेवी संगीत संस्था प्रथम

कला अकादमीची राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धा

पणजी, दि. ८ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - कला अकादमीतर्फे आयोजित राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत वनदेवी संगीत संस्था, कायसूव यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर द्वितीय पारितोषिक केळबाई महिला भजनी मंडळ, कुडणे यांनी पटकावले.युवती भजनी मंडळ अडकोण बाणास्तारीला तिसरा क्रमांक मिळाला. चौथ्या क्रमांकावर कृष्णाई महिला भजनी मंडळ मांद्रे यांना समाधान मानावे लागले.
राज्यातील विविध सहा केंद्रांवर घेतलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण १३४ महिला भजनी पथकांनी भाग घेतला. प्रत्येक केंद्रावरील दोन विजेत्यांची निवड करून एकूण बारा पथकांची कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक भगवती महिला कला सांस्कृतिक मंडळ तुये व भूमिका वेताळ महिला भजनी मंडळ पालये यांना देण्यात आले.
उत्कृष्ट पखवाज वादक हेमलता सतरकर युवती भजनी मंडळ अडकोण बाणास्तारी, उत्कृष्ट संवादिनी वादक सुवर्णा पिळगावकर भाविका महिला भजनी मंडळ दिवाडी तर उत्कृष्ट गायिका सुरभी कुडचडकर पुरूषम्हारू महिला भजनी मंडळ कुडचडे तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट अस्थायी गायिका म्हणून दीक्षा पुनाजी, भगवती महिला कला सांस्कृतिक मंडळ तुये यांची निवड करण्यात आली.
रजनी ठाकूर, मधुसूदन थळी आणि शाम पार्सेकर यांनी परीक्ष म्हणून काम पाहिले. सकाळपासूनच आपापल्या पथकाचा गणवेश (विविध रंगातील साड्या) परिधान करून कला अकादमीच्या आवारात महिलांची वर्दळ वाढली होती. प्रत्येक पथक आपल्या सादरीकरणासाठी वाट पाहात होते.कला अकादमीत दरवर्षी होणाऱ्या या बाल कलाकार, पुरुष आणि महिला भजन स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी शांतादुर्गा बाल भजनी मंडळाने रसपूर्ण भजन सादर करून रसिकांची वाहव्वा मिळवली. बक्षीस वितरणावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, परीक्षक रजनी ठाकूर, मधुसूदन थळी व शाम पार्सेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सहा केंद्रातील प्राथमिक फेरीतील विजेत्यांना तसेच राज्यस्तरीय विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
श्रीवास्तव म्हणाले की भजनातून समर्पण भाव निर्माण होत असतो आणि समर्पण भाव माणसाला जीवनात पुढे जायला मदत करीत असतो. समाजाला जोडण्याचे काम भजनातूनच होत असते.
डॉ. फळदेसाई यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रम अधिकारी प्रदीप गावकर यांनी सूत्रनिवेदन केले. डॉ. गोविंद काळे यांनी आभार मानले.

No comments: