एकाच रात्री चोऱ्या; साडेतीन लाखांचा ऐवज पळवला
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - श्रावण महिन्याच्या प्रारंभीच आपला इंगा दाखवताना चोरट्यांनी एकाच रात्री भाटले - पणजी येथील श्री सटी भवानी मंदिरातील २.३३ लाखांचा तर बेती येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील १.७५ लाखांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूने पोलिसांकडून गस्तीत वाढ केल्याचा दावा केला जात असतानाच दुसऱ्या बाजूने चोऱ्यांच्या प्रकरणांतही वाढ होत असल्याने या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
भाटले येथील श्री सटी भवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची दोन कर्णफुले, सोन्याची नथ, चांदीची प्रभावळ व चांदीचा मुकुट चोरांनी लंपास केल्याची तक्रार देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव आरोंदेकर यांनी पणजी पोलिस स्थानकात दिली आहे. तर, बेती येथील शांतादुर्गा मंदिरातील चांदीची प्रभावळ चोरट्यांनी पळवल्याची तक्रार देवस्थान समितीच्या अध्यक्ष शीतल चोडणकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवली आहे.
काल रात्री पहाटेच्या सुमारास या चोऱ्या झाल्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सटी भवानी मंदिराच्या बाजूलाच देवस्थानाचे श्रीधर भटजी राहतात. चोरी करण्यापूर्वी चोरांनी त्यांच्या खोलीच्या मुख्य दरवाजाला कडी घातली. त्यानंतर मंदिराच्या गर्भकुडीच्या दरवाजाची कडी पद्धतशीरपणे तोडून आतमध्ये प्रवेश केला. पहाटे ५.३० वाजता भटजींना जाग आली तेव्हा आपल्या खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी घातल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी खिडकीतून बाहेर येऊन त्यांनी कडी काढली व मंदिरात पाहणी केली असता चोरीचा प्रकार त्यांना समजला. त्यांनी लगेच देवस्थान समितीच्या अध्यक्षांना बोलावून याची माहिती दिली.
दरम्यान, एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मंदिरफोडीची प्रकरणे बरीच वाढली आहेत. मात्र अद्याप कोणालाच या प्रकरणात अटक करण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी शहरात सर्वत्र कडक पोलिस गस्त असते, असा दावा पोलिस करीत असले तरी मुख्य रस्ता सोडल्यास अन्य ठिकाणी पोलिस फिरकतही नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या दोन्ही घटनांची चौकशी पणजी व पर्वरी पोलिस करीत आहेत.
Friday, 13 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment