Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 10 August 2010

स्वाईन फ्लूच्या रुग्णांची राज्यात झपाट्याने वाढ

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मलेरिया बरोबरच "स्वाईन फ्लू' या संसर्गजन्य तापाची लागण झालेल्या रुग्णांची राज्यात झपाट्याने वाढ होत असून आणखी दहा जणांना या तापाची लागण झाली आहे. दरम्यान, केवळ ऑगस्ट महिन्यातच १६ जणांना या ज्वराची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य खात्यातून उपलब्ध झाली आहे.
जानेवारी ते ऑगस्टपर्यंत २२ जणांना स्वाईन फ्लू तापाची लागण झाली आहे. त्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर आणखी संशयित रुग्णही आढळून आले आहेत. त्यांच्या थुंकीचे नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. जुझे डीसा यांनी दिली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत संसर्गजन्य रोगाचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. "स्वाईन फ्यू' या तापाने आपल्या देशात आणि राज्यातही प्रवेश केला आहे व या रोगाचा फैलाव अतिशय वेगाने होत असल्याचेही ते म्हणाले. या रोगाचा राज्यात होणारा फैलाव लक्षात घेऊन मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून येत्या १३ ऑगस्ट रोजी समितीची बैठक होणार आहे.
गेल्या वर्षी ५२ जणांना "स्वाईन फ्लू' तापाची लागण झाली होती. त्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावेळी सहा महिन्यांत १२ जणांना या तापाची लाग झाली आहे तर गेल्या काही दिवसांत १४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूने गोव्यात प्रमथच प्रवेश केला होता. २००९च्या जून महिन्यात या तापाची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर राज्य सरकारने वास्को - दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक पथक तैनात करून विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली होती. त्यावेळी हजारो रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र या वर्षी या रोगाचे जिवाणू येथेच आढळून आले असल्याने विमानतळावर कोणतीही विशेष दक्षता घेतली जात नाही, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.
दक्षिण गोव्यात अधिक लोकांना या तापाची लागण झाली आहे. सासष्टी, मुरगाव व तिसवाडी तालुक्यातील स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून प्रत्येक विद्यालयात पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच विद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्याला ताप येत असल्यास त्याला त्वरित घरी पाठवून त्या भागातील आरोग्य अधिकाऱ्याला त्याची माहिती देण्याची सूचना विद्यालय प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच सतत हात स्वच्छ धुण्याची सूचनाही लोकांना देण्यात आली आहे, असे डॉ. डिसा यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------
स्वाईन फ्लूची लागण होणाऱ्या रुग्णांच्या सतत संपर्कात येणाऱ्या सरकारी तसेच खाजगी डॉक्टरांना व पॅरा मेडिकलच्या सहा हजार रुग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ही लस केंद्र सरकारने उपलब्ध केली आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला ही लस टोचून घ्यावयाची असल्यास ती खाजगी औषधालयात उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. डीसा यांनी दिली.

No comments: