पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - ताळगाव पंचायतीच्या सरपंच जेनिफर मोन्सेरात यांच्या विरुद्ध बेकायदा पद्धतीने बंगला पाडल्याची तक्रार प्रसिद्ध फॅशन डिझायनर नियोल आंद्रे यांनी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. तसेच मोन्सेरात यांनी आपल्या बंगल्यातील पाच लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप, गॉगल, बूट व अर्मानी पर्फ्यूम चोरून नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी त्यांनी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह उपसरपंच प्रकाश रुझारियो, कॉलिन करी, सेबी व सिडनी बार्रेटो यांच्या विरुद्धही तक्रार दाखल केली आहे. आपल्या बंगल्याचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचा दावा आंद्रे यांनी या तक्रारीत केला आहे.
नियोल आंद्रे यांच्या म्हणण्यानुसार, आपण "एचआयव्ही पॉझिटिव्ह' असल्याने आपली सतावणूक केली जात आहे. तसेच, सरपंच जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्याला कोणतीही आगाऊ नोटीस न देता आपल्या बंगल्यात घुसून त्याची नासधूस केली आहे. आंद्रे हे प्रख्यात फॅशन डिझायनर असून दोना पावला येथे त्यांचा बंगला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. सरपंचांनी आपण नसल्याचा मोका साधून ही बेकायदा कारवाई केली असल्याचे आंद्रे यांनी म्हटले आहे.
बंगल्याची मोडतोड करण्यासाठी स्वतः जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या. तसेच उपसरपंचांनी आपल्या बंगल्यात घुसून ही नासधूस केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी बंगल्यातील लाखो रुपयांची चोरीही केली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भा. दं. सं १६६, ४२७, ४४७ व ५०६ कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी पणजी पोलिस स्थानकात केली आहे.
या तक्रारीची एक प्रत राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, पंचायत संचालनालयाचे संचालक मिनीन डिसोझा यांना देण्यात आली आहे. सिडनी बार्रेटो हे ताळगाव पंचायतीचे पंच सदस्य असून त्यांच्याकडून आपण बंगल्याच्या बांधकामासाठी कच्चा माल घेतला होता. तेही यांच्याबरोबर यावेळी असल्याचे आंद्रे यांनी सांगितले. पणजी पोलिसांनी अद्याप या तक्रारीची नोंद करून घेतलेली नाही.
Friday, 13 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment