पोलिसच यंत्रणेच्या आशीर्वादामुळे पेडणेवासीय संतप्त
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - पेडणे पोलिसांच्या उपस्थित काल रात्री भाईडवाडा कोरगाव येथील बेकायदा खाणीवरील खनिज मालाची वाहतूक करण्यात आली. विधानसभा संपताच पोलिसांनीही आज पुन्हा एकदा "खुलेआम' बेकायदा गोष्टींना पाठिंबा देण्याचे धाडस दाखवायला सुरुवात केली आहे. पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या मालकीच्या जमिनीत उत्खनन करून या खनिजाची वाहतूक केली जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. या वाहतुकीसाठी अनेक ट्रक याठिकाणी आणण्यात आले आहे. याचा सुगावा लागताच पेडणे येथील व्यंकटेश घोडगे यांनी पेडणे पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच तेथे बेकायदा खनिज मालाची वाहतूक होत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी उलट त्यांनाच दमदाटी करून "तुम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही' असे म्हणून दूरध्वनी ठेवून दिला. जेथून या ट्रकांची वाहतूक केली जात होती तेथे एक पोलिस वाहनही उभे होते, अशी माहिती मिळाली आहे.
बेकायदा खाणीचा विषय विधानसभेत गाजत असताना आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून बेकायदा खाणींवर कारवाईची घोषणाबाजी सुरू असताना दुसऱ्या बाजूने खुलेआम बेकायदा खनिजाची वाहतूक केली जात आहे.विशेष म्हणजे या वाहतुकीला पोलिसांचीच साथ मिळत असल्याने या खनिज वाहतुकीवर कोण अंकुश ठेवणार, असा प्रश्न सध्या पेडणेवासीयांना पडला आहे.
केवळ रात्रीच्याच वेळी येथून खनिजाची वाहतूक केली जाते. दिवसा याठिकाणी सामसूम असते. रस्त्यावर पडलेला खनिज माल हा तेथून खनिज वाहतूक होत असल्याचा पुरावा आहे. मात्र कारवाई करण्यासाठी कोणीही तयार नाही.
स्थानिक आमदार दयानंद सोपटे व मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या बेकायदा खनिज उत्खननाविरोधात जोरदार आवाज उठवला असून तेथे खनिजाचे उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Sunday, 8 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment