भोपाळ, दि. १३ : राजस्थानातील धौलपूर येथून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात स्फोटके घेऊन जाणारे तब्बल ६१ सरकारी ट्रक मार्गातच बेपत्ता झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. यात सुमारे ६०० टन स्फोटके होती. यामागे माओवाद्यांचा हात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे व या स्फोटकांच्या माध्यमातून ते आगामी काही दिवसांत काही मोठा घातपात घडवून आणणार की काय, या विचाराने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
सागरचे पोलिस महानिरीक्षक अन्वेष मंगलम् यांनी आज एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्फोटके नेणारे हे ट्रक राजस्थानातून निघाले होते. तेथील धौलपूर येथील "राजस्थान एक्स्प्लोसिव्हज ऍण्ड केमिकल्स' या कारखान्यातून सागरमधील गणेश मॅगझीन या व्यापारी संस्थेला एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ही स्फोटके पाठविण्यात आली होती. त्यांची एकूण किंमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी होती.
यातील शेवटचा माल चार दिवसांपूर्वी संस्थेत पोहोचणे अपेक्षित होते. पण, आजपर्यंत या बेपत्ता ट्रक्सचा तसेच त्यातील स्फोटकांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. ही स्फोटके माओवादी किंवा समाज विघातक शक्तींच्या हाती लागली असण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मध्यप्रदेश सरकारकडून दखल
देशात सध्या नक्षलवाद बोकाळला आहे. अशा स्थितीत हा प्रकार होणे अतिशय चिंताजनक बाब असल्याचे मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे. हे प्रकरण गंभीर असून हरवलेले ट्रक शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. पोलिसांची चार पथके राजस्थान, आंध्र आणि महाराष्ट्रात पाठविण्यात आल्याची माहिती मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी दिली.
यापूर्वी अशा घटना नक्षलग्रस्त राज्यांमध्ये बऱ्याचदा घडल्या आहे. तसेच नक्षलवाद्यांनी सरकारी स्फोटके आणि शस्त्रास्त्रे लुटण्याचेही प्रकार वरचेवर घडत असतात. त्यामुळे या घटनेमागे नक्षली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Saturday, 14 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment