Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 June 2010

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले

भाजप, डावे खवळले
पेट्रोल ३.७३
डिझेल २
केरोसीन ३
सिलिंडर ३५

नवी दिल्ली, दि. २५ : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत आज अखेर केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीची घोषणा करून सातत्याने वाढत असलेल्या महागाईने होरपळून निघालेल्या सामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर रु. ३.७३, डिझेल रु. २ आणि केरोसीनच्या दरात प्रतिलीटर ३ रुपयांची दरवाढ करण्याची घोषणा सरकारने केली. सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रमुख घटक असलेल्या सिलिंडरच्या दरात तर तब्बल ३५ रुपयांनी वाढ केली असल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारप्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ही इंधन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे, असे सरकारतर्फे आज सांगण्यात आले.
पेट्रोलियम पदार्थांवरील सरकारी नियंत्रण हटविण्यासंदर्भात मंत्रिगटाने आज घेतलेल्या आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार पेट्रोलच्या दरावरील सरकारी नियंत्रण पूर्णपणे हटवण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार ठरवले जाणार आहेत. सध्या डिझेलच्या किमतीवरील सरकारचे नियंत्रण कायम ठेवत डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, डिझेलच्या दरावरील सरकारी नियंत्रण लवकरच हटविण्यात येईल, असे केंद्रीय पेट्रोलियम सचिव एस. सुंदरेशन यांनी उच्चाधिकार प्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ७७ अमेरिकी डॉलर्स प्रतिबॅरल एवढ्या आहेत. त्या मानाने या किमती कमी असल्याने त्याचा फायदा उठवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे सरकारी तेल कंपन्यांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी सरकारला मोठी मदत होणार आहे, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री आणि सत्तारूढ संपुआचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीच्या सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेवरचा बोजा आणखी वाढणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला आम्ही योग्य व्यासपीठावर विरोध करू, असे बॅनर्जी यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले
इंधन दरवाढ रद्द करा : डाव्यांची मागणी
नवी दिल्ली, दि. २५ : इंधन आणि गॅस सिलिंडरच्या दरात आज झालेली वाढ म्हणजे सरकारने सर्वसामान्य जनतेवर केलेला मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत ही दरवाढ सरकारने ताबडतोब रद्द करावी, अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे.
देशातील सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळून निघालेली असतानाच सरकारने पेट्रोलियम पदार्थ आणि गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करून जनतेला आणखी एक "शॉक' दिला आहे. या वाढीचे समर्थन करण्यासाठी सरकार खोटी कारणे देत आहे, असा आरोप माकपा, भाकपा, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉक या चार पक्षांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात केला आहे.
खाद्यान्न महागाईचा निर्देशांक १७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. अशातच ही दरवाढ करून "कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ' असे आश्वासन देऊन सत्तारूढ झालेल्या सरकारने आपले खरे रूप जनतेला दाखवून दिले आहे. आज जगात सगळ्यात जास्त महागाई निर्देशांक असलेला देश भारत आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असेही डाव्या पक्षांनी म्हटले आहे. पेट्रोलवरील सरकारी नियंत्रण हटविण्याचा सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय घातक ठरणार आहे, असेही डाव्या पक्षांनी म्हटले आहे.
संसदेत अंदाजपत्रक सादर केल्यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन रुपयांनी वाढविण्यात आले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत खूप वाढ झाली नाही. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने आपल्या कररचनेत बदल करण्याची गरज आहे. इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावला जात असल्याने या पदार्थांचे दर विनाकारण वाढतात, असेही निवेदनात म्हटले आहे.
------------------------------------------------------------
इंधन दरवाढीविरोधात भाजपचे स्वाक्षरी अभियान
नवी दिल्ली, दि. २५ : पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिलिंडरच्या दरात सरकारने आज केलेल्या वाढीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली असून, आपले धोरण जनहितविरोधी असल्याचे संपुआ सरकारने दाखवून दिले आहे, असे म्हटले आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे आणखी कठीण होणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
इंधन दरवाढ करून आम आदमीवर आणखी बोजा टाकण्याच्या संपुआ सरकारच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. खाद्यान्न महागाई १७ ते २० टक्क्यांच्या घरात पोहोचत असतानाच सरकारने ही दरवाढ करून सामान्य जनतेवर आघात केला आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी इंधन दरवाढीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
इंधन दरवाढीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप देशव्यापी निदर्शने करणार आहे. महागाईने आधीच होरपळलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी इंधन दरवाढ करून आपले धोरण जनहितविरोधी असल्याचे संपुआ सरकारने दाखवून दिले आहे. या दरवाढीमुळे आगामी काळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणखी वाढतील, असेही जावडेकर यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करावी लागल्याचा संपुआ सरकारचा दावा पूर्णपणे "बोगस' आहे, असा आरोप जावडेकर यांनी यावेळी केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती लक्षात घेतल्या आणि या पदार्थांवर कर लावले नाही तर पेट्रोल आणि डिझेल २५ रुपये प्रतिलीटर भावाने मिळाले पाहिजे. परंतु, यावर १०० टक्के कर लावण्यात येत असल्याचे, जावडेकर यांनी सांगितले.
या इंधन दरवाढीच्या विरोधात भाजप स्वाक्षरी अभियान राबविणार असून, संसदेच्या येत्या मान्सून अधिवेशनात राष्ट्राध्यक्षांना १० कोटी जनतेच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.

No comments: