आमदारकीचा राजीनामा
मंत्रिपदाची नव्याने थपथ
सहा महिन्यांत पोटनिवडणूक
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): वाळपईचे अपक्ष आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर करून असंख्य कार्यकर्त्यांसह रीतसर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दुपारी कॉंग्रेस भवनात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी राजभवनावर एका सोहळ्यात राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी त्यांना नव्याने मंत्रिपदाची शपथ दिली. पूर्वीचीच खाती त्यांच्याकडे ठेवण्यात आली आहेत. विश्वजित राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे पक्षाचे विधानसभेतील संख्याबळ २० झाले आहे व त्यामुळे कॉंग्रेस पूर्ण बहुमताच्या उंबरठ्यावर उभी आहे. तर, येत्या ६ महिन्यांत त्यांना पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे.
आज सकाळपासूनच राजधानीत विश्वजित राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे राजकीय गोटात चर्चांना ऊत आला होता. सकाळी कृषिमंत्री या नात्याने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान केल्यानंतर विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती प्रतापसिंह राणे यांना सादर केला. त्यानंतर कॉंग्रेस भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विश्वजित राणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षाचा रीतसर अर्ज भरून पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या पत्नी दिव्या राणे हजर होत्या. या प्रसंगी शिवोलीचे राष्ट्रवादीचे नेते उदय पालयेकर यांनीही कॉंग्रेस प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, गृहमंत्री रवी नाईक, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार आग्नेल फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, बाबू कवळेकर, प्रताप गावस व विश्वजित राणे यांचे असंख्य कार्यकर्ते हजर होते. सत्तरीतून आलेल्या कार्यकर्त्यांना जेवणाची सोय कॉंग्रेस भवनासमोरील एका हॉटेलात केली होती व तिथे जेवणासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाल्याचे दिसत होते.
आमदारकी नसताना मंत्रिपद
कॉंग्रेस भवनातील कार्यक्रमानंतर या नेत्यांनी थेट राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रमासाठी कूच केली. राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी राणे यांना मंत्रिपदाची शपथ दिली. विश्वजित यांच्याकडे पूर्वीचीच खाती राहतील, असे मुख्यमंत्री कामत यांनी स्पष्ट केले. या शपथविधी सोहळ्याला मगोचे नेते वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. सुदिन ढवळीकर यांचे मंत्रिपद काढून घेतले जाईल, अशी जोरदार चर्चा यावेळी सुरू होती. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर हे या ठिकाणी प्रफुल्लित चेहऱ्याने फिरत असल्याचे पाहून सुदिन ढवळीकर यांचे मंत्रिपद त्यांनाच मिळेल, अशी शक्यताही अनेकजण वर्तवीत होते. सभापती प्रतापसिंह राणे काहीशा गंभीर चेहऱ्याने या ठिकाणी उपस्थित होते, पण विश्वजित यांच्या मातोश्री विजयादेवी राणे यांची गैरहजेरी मात्र अनेकांना खुणावत होती. विश्वजित राणे यांनी डोक्याचे मुंडण केल्याने त्यांनी धार्मिक स्थळाला भेट दिल्याचे जाणवत होते. कॉंग्रेस प्रवेशापूर्वी त्यांनी कुठलातरी धार्मिक विधी पार पाडून पक्षातील प्रवेश फलदायी ठरावा, अशी प्रार्थना केल्याची कुजबुज त्यांच्या समर्थकांत सुरू होती.
यापुढे सत्तरीत केवळ कॉंग्रेसः विश्वजित
यापुढे सत्तरी तालुक्यात केवळ कॉंग्रेसच असेल, अशी दर्पोक्ती विश्वजित राणे यांनी केली. आपण कोणत्याही अटीविना कॉंग्रेस पक्षात दाखल झालो आहे व यापुढे कॉंग्रेस श्रेष्ठी व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आदेशांनुसारच वागेन. पुढील निवडणुकीत मला उमेदवारी द्यावी की नाही हा निर्णय श्रेष्ठींनी घ्यावयाचा आहे, असेही वरकरणी त्यांनी सांगून टाकले. कॉंग्रेसची संघटना बळकट करणे हे आपले प्राधान्य असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
सुदिन ढवळीकरांचे मंत्रिपद जाणार?
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मंत्रिपदाची पूर्ण मदार आता विश्वजित राणे यांच्यावर अवलंबून आहे. विश्वजित राणे कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याने ते आता ढवळीकरबंधुंची कितपत पाठराखण करतात यावरच सुदिन ढवळीकर यांचे भवितव्य ठरणार आहे. कॉंग्रेस पक्षाकडून मात्र ढवळीकर यांचे मंत्रिपद काढून घेण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांच्यावर दबाव वाढला आहे. विधानसभा अधिवेशनापर्यंत सुदिन ढवळीकर यांना अभय देणे व त्यानंतरच त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती कॉंग्रेस गोटातून मिळाली आहे.
Friday, 25 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment