पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): जामिनावर मुक्त झालेला इस्रायली ड्रग माफिया "अटाला' किनारी भागात गेला होता का, याची आम्ही चौकशी करणार असल्याचे आज पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बस्सी यांनी सांगितले. त्याने किनारी भागात जाऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही श्री. बस्सी यावेळी म्हणाले.
पोलिस ड्रग माफिया साटेलोटेप्रकरणी चार महिने तुरुंगात असलेला ड्रग माफिया "अटाला' काल सायंकाळी सडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने शापोरा गाठले होते. शापोरा हे किनारी भागातच येत असल्याने त्याने न्यायालयाने जामीन मुक्त करताना दिलेल्या आदेशाचा अवमान केला होता.
सडा तुरुंगातून आल्यावर त्याने पणजी येथे वकिलाचे कार्यालय गाठले. त्यानंतर रात्री ९. १५ वाजता एका भाड्याच्या टॅक्सीतून तो शापोरा येथे गेला होता. यावेळी त्याला बाद्यांन या उतरणीवर सोडण्यात आले होते. तेथून काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात तो रात्री राहण्यासाठी गेला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, आज दिवसभरात तो एका "व्हॅगन आर' या वाहनातून किनारी भागात फिरत होता, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.
"अटाला' याच्याकडे गोव्यात राहण्यासाठी अधिकृत व्हिसा नसतानाही तो सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे गोव्यात फिरत आहे. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यास मात्र गोवा पोलिस असमर्थ ठरले आहे. अनधिकृतपणे गोव्यात राहणाऱ्या विदेशी लोकांना ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांना ताब्यात घेतले जात नसल्याचे पोलिस खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोव्यात अनधिकृतपणे राहणाऱ्या विदेशी लोकांना गोवा म्हणजे अनैतिक धंदे करण्यासाठी मोकळे रान असल्याची अनेकांची समजूत झाली आहे.
Friday, 25 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment