Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 June 2010

बाबूश मोन्सेरात कॉंग्रेसमध्ये दाखल

युवक कॉंग्रेस खवळली, सरकारातही प्रचंड अस्वस्थता
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): दोनापावला येथील "राजीव गांधी आयटी हॅबिटॅट' प्रकल्प बंद पाडण्यास सरकारला भाग पाडलेले, अडीच वर्षांपूर्वी याच प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा ठपका असलेले, अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल झालेले, विशेष म्हणजे पणजी पोलिस स्थानकावर हल्लाबोल करण्याच्या प्रकरणी "सीबीआय'ने आरोपपत्र दाखल केलेले ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज (सोमवारी) "युगोडेपा' पक्षाच्या विलीनीकरणासह दिमाखात कॉंग्रेस पक्षात फेरप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांचे या प्रसंगी स्वागत केले. बाबूश यांच्या फेरप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान बाबूश यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे नाराज झालेल्या युवक कॉंग्रेसने ताळगाव मारहाणप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची पुन्हा एकदा जोरदार मागणी केली.
दरम्यान, पणजी पोलिसस्थानक तोडफोड प्रकरणी सीबीआयने बाबूशविरुद्ध आरोपपत्र दाखल केले तेव्हा बाबूश कॉंग्रेसचे नाहीत त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेता येणार नाही, असा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी तेव्हा घेतला होता, आता तेच बाबूश कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याने मुख्यमंत्री काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या सुमारे दीडशे समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. ते युगोडेपाच्या तिकिटावर निवडून आले होते. तथापि, मध्यंतरी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने ते "युगोडेपा'चे असंलग्न आमदार या नात्यानेच वावरत होते. आज (सोमवारी) कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करताना आपण युगोडेपाचे कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा व नव्याने निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी युगोडेपा पक्षाचा एकही पदाधिकारी किंवा नेता दिसत नव्हता; पण विलीनीकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण केली, असल्याचे सांगून त्यांनी याविषयी अधिक भाष्य करण्याचे टाळले. कॉंग्रेस प्रवेशामुळे आता राजीव गांधी आयटी हॅबिटॅटचा मार्ग मोकळा झाला, असे समजावे काय, असा सवाल काही पत्रकारांनी केला असता त्यांनी तात्काळ त्याला आक्षेप घेतला. कॉंग्रेस प्रवेश व आयटी हॅबिटॅट विरोध हे दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. त्यांचा परस्परांशी अजिबात संबंध नाही. आयटी हॅबिटॅटच्या बाबतीत अनेक आक्षेपार्ह गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे जनहितासाठीच या प्रकल्पाला आपण विरोध केला. तो सुरूच राहील. आपला कॉंग्रेस प्रवेश अटळ होता. श्रेष्ठींकडून केव्हा हिरवा कंदील दाखवला जातो याची वाट आपण पाहात होतो. आपल्याकडून काही चुका घडल्या. त्याचे प्रायश्चित्त घेताना एवढे करूनही आपल्याला सन्मानपूर्वक फेरप्रवेश देणारा कॉंग्रेस पक्ष दिलदार आहे, अशी स्तुतिसुमनेही यावेळी मोन्सेरात यांनी उधळली.
दरम्यान, बाबूश यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे खातेबदल होण्याची शक्यता मात्र मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. कॉंग्रेस भवनात झालेला हा छोटेखानी कार्यक्रम तात्काळ आटोपता घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे नेत्यांनी टाळले.
आरोपपत्र दाखल कराच : आमोणकर
राजीव गांधी आयटी हॅबिटॅट प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी मोर्चा काढलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर १८ डिसेंबर २००७ रोजी बाबूश समर्थकांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. त्यामुळे युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण बाबूश यांच्याविरोधात दाखल केलेली पोलिस तक्रार मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया संकल्प आमोणकर यांनी दिली. पक्षात कोणाला प्रवेश देणे वा न देणे हा श्रेष्ठींचा अधिकार आहे व त्यामुळे बाबूश यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत आपण बोलणार नाही. ताळगाव हल्ला प्रकरणी ते व त्यांच्या साथीदारांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर आरोपपत्र दाखल व्हायलाच हवे, या भूमिकेवर आपण ठाम आहोत. बाबूश यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचा हा विषय आपण राष्ट्रीय युवक कॉंग्रेसकडे नेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ऍड. नार्वेकर समर्थकांची नाराजी
क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचा बाऊ करून त्यांना मंत्रिपद सोडण्यास भाग पाडण्यात आले. मात्र अनेक प्रकरणांत आरोपपत्र दाखल झालेले बाबूश हे कॉंग्रेसला कसे काय परवडतात, असा सवाल ऍड. नार्वेकर यांच्या समर्थकांनी केला आहे. मुख्यमंत्री कामत यांच्याकडून इतके दिवस बाबूश मोन्सेरात हे कॉंग्रेसचे आमदार नाहीत व त्यामुळे आरोपपत्राचा न्याय त्यांना लागू होत नाही, असे म्हणून वेळ मारून नेत होते. आता ते कोणत्या तोंडाने बाबूश यांचे समर्थन करणार आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आरोपपत्र हे केवळ निमित्त, पण मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक ऍड. दयानंद नार्वेकर यांना लक्ष्य बनवल्याची टीकाही त्यांनी केली.
सुदिन ढवळीकर यांना डच्चू?
कॉंग्रेस पक्षाविरोधात कटकारस्थान करून सरकारवर दबाव ठेवण्यासाठी कॉंग्रेसेतर आमदारांनी तयार केलेल्या "जी - ७' गटाची वासलात कॉंग्रेसने लावली आहे. या गटाचे नेते मिकी पाशेको यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बाबूश मोन्सेरात यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे सदर गटाची फरफट सुरू झाली आहे. आता सुदिन ढवळीकर यांच्याकडील मंत्रिपद काढून घेण्यासाठी कामत यांच्यावर दबाव वाढला आहे. ढवळीकर यांचे मंत्रिपद काढून तिथे पुन्हा एकदा पांडुरंग मडकईकर यांची वर्णी लावण्याची तयारीही कॉंग्रेसने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा कॉंग्रेस प्रवेशही निश्चित आहे व तसे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी दिले. विश्वजित यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर कॉंग्रेस आमदारांची संख्या २० वर पोहोचेल. त्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे हा आकडा २३ वर जाणार असल्याने मगो पक्षाची सरकारला अजिबातच गरज भासणार नाही, अशी चर्चा आज कॉंग्रेस वर्तुळात सुरू होती.

No comments: