Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 June 2010

जामीन अर्जांवर आज सुनावणी

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भूमिगत झालेले माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांचा पंधरा दिवस दिवस उलटले तरी शोध लावण्यात गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले नसून उद्या त्यांच्या दुसऱ्यांदा सादर करण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन ए. ब्रिटो यांनी मिकी पाशेको व त्यांचे विशेषाधिकारी लिंडन मोन्तेरो यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर दोघा संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीसमोर अर्ज सादर केला आहे. त्यानंतर हे दोन्ही अर्ज पुन्हा गोवा खंडपीठासमोर सुनावणी घेण्यासाठी पाठवून देण्यात आले आहेत. उद्या त्या अर्जावर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
गेल्यावेळी न्यायालयाने लिंडन याच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी त्यांना प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला होता. दरम्यान, मुख्य न्यायमूर्तीसमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावरून नवीन वाद सुरू झाला असून मिकी पाशेको हे गोव्यातच असल्याचे सिद्ध झाले आहे. मडगाव येथील एका नोटरीसमोर त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रावर सही केल्याचे उघड झाले आहे. तर, लिंडन यांनी मुंबई येथील एका नोटरीसमोर उपस्थित राहून सही केली आहे. मिकी गोव्यात असूनही गुन्हा अन्वेषण विभागाला त्यांचा शोध कसा लागत नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मिकी गोव्यात नाही किंवा नोटरीसमोर केलेली सही प्रकरण खरे नाही, असा वाद सुरू झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला असून याची गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

No comments: