मिकीच्या "प्रसिद्ध' पिस्तुलाचीही सखोल चौकशी व्हावी - आयरिश
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको वापरत असलेल्या विनापरवाना पिस्तुलासंदर्भात पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी जोरदार मागणी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केली आहे. रागाचा पारा चढल्यानंतर मिकी पाशेको हे गेले अनेक वर्षे वापरत असलेल्या सदर पिस्तुलाचा वापर समोरच्या व्यक्तीला धमकावण्यासाठी करीत असत हे सर्वश्रुत असल्याचा दावाही ऍड. रॉड्रिगीस यांनी केला आहे.
हे बेकायदा शस्त्र मिकी हे आपल्या पाठीमागे पॅंटच्या पट्ट्याखाली "नाताल क्लॅफ्ट'मध्ये लपवून ठेवत असल्याची माहिती त्यांनी उघड केली आहे. नादिया तोरादो हिला धमकावण्यासाठी या शस्त्राचा वापर करण्यात आला आहे का, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आयरिश यांनी व्यक्त केली आहे. पाशेको याच्या तापट स्वभावामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बंदूक वापरासाठी परवानगी नाकारल्याने मिकी पाशेको हे विनापरवाना पिस्तूल वापरत होते, असेही ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे. मंत्रिपदी शपथबद्ध होताना भारतीय संविधानानुसार न्यायाची बूज राखण्याची शपथ घेणारे मिकी पाशेको हे गेले अनेक वर्षे कायद्याची भीती अथवा तमा न बाळगता कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आले असून त्यांची ही कृती निंदनीय असल्याचे मतही ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केले आहे.
Thursday, 24 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment