पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- अबकारी खात्यातील कथित घोटाळ्यासंबंधी माजी वित्त सचिव उदीप्त रे यांनी चौकशीसाठी मागवलेली महत्त्वाची कागदपत्रे सचिवालयातील त्यांच्या कार्यालयातून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यमान वित्त सचिव राजीव यदुवंशी यांना या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चौकशी करणे भाग पडले आहे. उदीप्त रे यांनी या चौकशीसाठी मागवलेल्या या कागदपत्रांत गेल्या तीन वर्षांतील अबकारी खात्यातील व्यवहारांचे महत्त्वाचे दस्तऐवज होते व त्यामुळे ते गायब होण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याची जोरदार चर्चा सचिवालयात सुरू आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणलेल्या आंतरराज्य अबकारी घोटाळ्याच्या चौकशीवरून सध्या बराच गोंधळ निर्माण झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी थंडावली आहेच परंतु या घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्याचा प्रकार उघडकीस आल्याने हा घोटाळा लपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे कळते. विद्यमान अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता या कागदपत्रांबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व कागदपत्रे आपण येण्यापूर्वीच पाठवण्यात आली होती व त्यामुळे आपण त्याबाबत अनभिज्ञ आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. वित्त सचिव राजीव यदुवंशी यांनी नव्याने काही महत्त्वाची कागदपत्रे मागवली आहेत काय, असे विचारले असता तसा कोणाताही आदेश किंवा सूचना आपल्याला अद्याप मिळाली नाही, असेही ते म्हणाले. काल २२ रोजी "गोवादूत'शी बोलताना राजीव यदुवंशी यांनी आपण घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे अबकारी खात्याकडून मागवली आहेत असे सांगितले होते. श्री. रेड्डी यांच्या वक्तव्यावरून तसे कोणतेही आदेश त्यांना मिळाले नसल्याने श्री. यदुवंशी यांनी केवळ वेळ मारून नेण्यासाठीच ही खोटी माहिती दिली की काय, असाही सवाल उपस्थित झाला आहे. हा एकूण प्रकार पाहता या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचाच जोरदार प्रयत्न सरकारी दरबारी सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
विशेष भरारी पथकांची स्थापना
गोव्यात बेकायदेशीरपणे आयात व निर्यात होणाऱ्या मद्यार्कावर नजर ठेवण्यासाठी अबकारी खात्यातर्फे विशेष भरारी पथकाची स्थापना केल्याची माहिती आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी दिली. राज्यातील दोन्ही सीमा खुल्या झाल्याने मद्यार्काच्या बेकायदा वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता असल्यानेच ही पथके स्थापन केल्याचे ते म्हणाले. ही पथके पेडणे, डिचोली तसेच काणकोण व सांगे सीमेवर करडी नजर ठेवणार आहेत. या पथकात दोन अबकारी निरीक्षक व पाच अबकारी रक्षकांची नियुक्ती केली आहे. रात्रीचे १० ते सकाळी ४ वाजेपर्यंत सर्व सीमांवर कडक तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले. बेकायदा मद्यार्काची वाहतूक रोखण्यासाठीच अबकारी खात्याने आपली यंत्रणा सज्ज ठेवल्याचेही ते म्हणाले.
Thursday, 24 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment