Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 22 June 2010

'हिंदू संस्कृतीसाठी मंदिर उभारणी आवश्यक'

ब्रह्मेशानंद स्वामी गोव्यात परतले
वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): हिंदू संस्कृती टिकून राहण्यासाठी तसेच सामाजिक उद्धारासाठी मंदिरांची उभारणी करणे आवश्यक आहे. मंदिरांमुळे सलोखा टिकून राहतो. तथापि, या मंदिरांच्या सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून न राहता ती जबाबदारी आपण स्वतः उचलली पाहिजे, असे आवाहन प.पू.ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी केले.
महाबुद्ध मुख्यालय, कोलंबो - श्रीलंका येथे १८ ते २० जूनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हिंदू-बौद्ध महासभेत भारतातर्फे अकरा प्रतिनिधींनी आपला सहभाग दर्शवला होता. गोव्यातून प. पू. ब्रह्मेशानंद भारताचे एक प्रतिनिधी म्हणून या महासभेला उपस्थित होते. आज दुपारी दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले असता त्यांच्या स्वागतासाठी शेकडो भक्तगण उपस्थित होते. यावेळी पुष्पहार भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महासभेत घेण्यात आलेल्या ठरावांची माहिती दिली. हिंदू व बौद्ध धर्मात बरेच साम्य असून या दोन्ही धर्माच्या लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याबाबत ठराव संमत झाल्याचे त्यांनी सांगितले. धर्मांतराला आळा घालण्यासाठी योग्य उपाय योजना करण्यावर महासभेत चर्चा करण्यात आली. याशिवाय या भारतावर वारंवार झालेल्या आक्रमणामुळे नष्ट करण्यात आलेल्या हिंदू तसेच बौद्ध धर्मीयांच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचा ठराव सभेत संमत करण्यात आला. यासाठी एका समितीची स्थापना करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींनी यावेळी सांगितले. यावेळी स्वामीजींचे भक्त मोठ्या संख्येने विमानतळाबाहेर उपस्थित होते.

No comments: