पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): बेकायदा खाण व्यवसाय, अबकारी घोटाळा, उच्चसुरक्षा नंबरप्लेट व ड्रग ही प्रकरणे कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरीही या प्रकरणांची भुते शेवटपर्यंत सरकारच्या मानगुटीवर नाचतील याची पूर्ण तयारी भाजपने ठेवली आहे. ड्रग प्रकरणात कोणत्या मंत्र्याचा पुत्र सामील आहे याचाही लवकरच पर्दाफाश केला जाईल. या सर्व प्रकरणांचा तपास लावून सत्य जनतेसमोर आणण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज दिली.
ड्रग प्रकरणातील पोलिस शिपाई संजय परब याला अटक चुकवण्यासाठी कोणी आश्रय दिला याबाबत पोलिस खात्याने मौन का धारण केले आहे, असा सवाल श्री. पर्रीकर यांनी केला. अटालाच्या सुटकेतही पोलिसांचे साटेलोटे आहेत. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना पोलिस तपासातील निष्क्रियतेवर ओढलेले ताशेरे हे याचे बोलके उदाहरण आहे. हे प्रकरण फुसका बार ठरावे यासाठी धडपडणाऱ्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडू व गुन्हेगारांना उघडे पाडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू, असेही यावेळी श्री. पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यापासून त्यांच्या सरकारातील तळापर्यंत सर्वच नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत व त्यामुळे अशा प्रकारांना एकप्रकारची मान्यताच मिळाल्याचा टोला श्री. पर्रीकर यांनी हाणला.
गुन्हा विभागाचीच चौकशी व्हावी
गुन्हा विभागच मुळी गुन्हेगारी प्रकरणांत गुंतले आहे, असा सनसनाटी आरोप करून या विभागाचीच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी ड्रग चौकशीबाबत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. गरज पडल्यास लकी फार्महाऊसची जबानी घेण्यासाठी पोलिसांना स्विडन पाठवण्याची भाषा करणारे पोलिस महासंचालक मंत्र्यांच्या विदेश दौऱ्याची परंपरा चालवू पाहत आहेत काय, असा सवालही श्री. पर्रीकर यांनी केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीची वक्तव्ये केली जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंतही श्री. पर्रीकरांनी व्यक्त केली.
Saturday, 26 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment