सचित म्हाऊसकर,
खोतोडे, वाळपई
गोव्यात वकिली शिक्षण घेण्यासाठी दोन महाविद्यालये आहेत, एक म्हणजे मिरामार येथील व्ही.एम. साळगांवकर कायदा महाविद्यालय व दुसरे म्हणजे मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालय. प्रत्येक वर्षाला या दोन्ही कायदा महाविद्यालयांतून अंदाजे दीडशे विद्यार्थी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एल.एल. बी. ची पदवी मिळवितात. ही पदवी मिळविल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वकिलीच्या व्यवसायात यायचे असते, अशा विद्यार्थ्यांना मुंबईला बार कौन्सिलच्या कार्यालयात जाऊन सनद मिळविण्यासाठी नोंदणी करावी लागते. काही वर्षापूर्वी गोव्यात वकिली सनदीसाठी लागणारे अर्ज उपलब्ध असायचे. परंतु, यंदा मात्र ते उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत.
विद्यार्थ्यांना हे अर्ज आणण्यासाठी मुंबईला जावे लागते व नंतर अर्ज घेऊन पुन्हा गोव्यात येऊन अर्जामध्ये सर्व तपशील भरावा लागतो व तपशील भरल्यानंतर सदर अर्ज पुन्हा मुंबईला जाऊन बार कौन्सिलच्या कार्यालयात सादर करावे लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. कारण सदर अर्ज मुंबईतच भरून एकाच वेळी देणे विद्यार्थ्यांना शक्य नसते. ज्या विद्यार्थ्यांना सनद हवी असते, त्या विद्यार्थ्यांच्या सनदीच्या अर्जावर त्या विद्यार्थ्याला तीन वर्षापासून ओळखणाऱ्या दोन वकिलांची सही लागते. परंतु, मुंबईत ओळख नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ही सही मिळत नाही, त्यामुळे हे अर्ज घेऊन गोव्यात यावे लागते व नंतर भरून मुंबईला जावे लागते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी गोव्यातून बार कौन्सिलवर निवडून जाणाऱ्या वकिलांनी या गोष्टीची दखल घेण्याची आवश्यकता असून बार कौन्सिल अतिरिक्त कार्यालय गोव्यात असायला हवे व तसेच मुंबईत नवीन वकिलांची नोंदणी करण्यापेक्षा नवीन वकिलांना गोव्यात नोंदणी करण्यासाठी बार कौन्सिलच्या वतीने येथे कार्यालय उघडायला हवे, जेणेकरून वकिलांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात. तसेच गोव्यात हे कार्यालय सुरू झाल्यास अनेक वकिलांच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत होऊ शकते.
Monday, 21 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment