Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 24 June 2010

बालरथाला मोले येथे अपघात

२२ विद्यार्थी जखमी

कुळे व फोंडा, दि. २३ (प्रतिनिधी)- अभिनव विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या "इंदिरा बालरथ' या बसला आज सकाळी सव्वासातच्या सुकतळी मोले येथे अपघात झाला. या बसमधील २२ विद्यार्थी जखमी झाल्याने त्यांना प्रथम फोंडा येथील आयडी इस्पितळात नेण्यात आले, त्यांपैकी ११ जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. यांपैकी एका विद्यार्थिनीला वगळता सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे.
इंदिरा बालरथ क्र. जीए ०७ एस ००५८ क्रमांची बस आज सकाळी नेहमीप्रमाणे अभिनव विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेच्या दिशेने चालली होती. यावेळी समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या केए १६ ए ५२१९ या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की बस रस्त्याच्या बाजूला कलंडली तर ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीला धडक देऊन विसावला. या घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. १०८ रुग्णवाहिका व उसगाव येथून अन्य एक बालरथ मागवून विद्यार्थ्यांना फोंडा येथील आयडी इस्पितळात नेण्यात आले. यावेळी रिमा सांगोडकर (१४), दीक्षा खुटकर (१६), रेश्मा खुटकर (११), मनीषा गावकर (११), दिव्या खुटकर (१२), क्षितिजा सांगोडकर (१३), श्वेता सांगोडकर (१३), समीक्षा शेटकर (१२), प्रीतम सांगोडकर (१५), डॉम्निक फर्नांडिस (१४) यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या विद्यार्थ्यांपैकी मनीषा गावकर या विद्यार्थिनीच्या डोक्याला मार लागल्याने तिला उशिरापर्यंत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. इतर विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
गेल्या २ वर्षांपूर्वी सुनील थोरात यांना याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात पत्नी व मुलासह त्यांचा मृत्यू झाला होता. आज सकाळच्या घटनेमुळे दोन वर्षांपूर्वीच्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकची बसला समोरासमोर धडक बसली असती तर अनर्थ घडला असता अशी प्रतिक्रिया यावेळी स्थानिकांनी दिली. केवळ दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी किरकोळ जखमांवर बचावल्याचे काहींनी सांगितले.
कुळे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मागदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments: