Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 21 June 2010

निवडणुकीनंतरही संपुआ राज्यसभेत अल्पमतातच

नवी दिल्ली, दि. २० - राज्यसभेच्या ५५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेल्या उलथापालथीनंतरही केेंद्रात सत्तारूढ असलेली संयुक्त पुरोगामी आघाडी सभागृहात अजूनही अल्पमतात आहे.
राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने आघाडीला यापुढेही अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर सर्वसहमतीचेच राजकारण करावे लागणार आहे. २४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतरही संपुआच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही. एवढेच नव्हे तर या निवडणुकीपूर्वी ७१ सदस्य असलेल्या कॉंग्रेसची सदस्यसंख्या निवडणुकीनंतर ६९ पर्यंत खाली आली आहे. या निवडणुकीत सगळ्यात जास्त फायदा संपुआचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या द्रमुकला झाला आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत ३ जागांवर विजय मिळवल्याने द्रमुक सदस्यांची संख्या आता ७ झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्वीइतकेच ६ आणि तृणमूल कॉंग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.
विरोधी पक्षांचा विचार केला तर या निवडणुकीचा सगळ्यात जास्त फायदा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला झाला आहे. भाजपाने कर्नाटक आणि राजस्थानमध्ये शानदार विजय प्राप्त केला, तर झारखंडमध्ये पक्षाला एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. ही निवडणूक समाजवादी पक्षसाठी जास्त नुकसानदायक ठरली. या निवडणुकीनंतर सपाची सदस्यसंख्या १० वरून ५ वर आली आहे.
सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तारूढ झाल्यापासूनच संपुआ राज्यसभेत अल्पमतातच आहे. संपुआला बाहेरून पाठिंबा देणारे सपा आणि राजद या पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे संपुआची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. या निवडणुकीत आंध्रप्रदेशातून कॉंग्रेस पक्षाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. यासाठी त्यांना लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याच्या प्रजा राज्यम पक्षाचीही मदत घ्यावी लागली. कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती फिस्कटल्याने पक्षाला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यामुळे पक्षाचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांचे राज्यसभेवर निवडून येण्याचे स्वप्न भंगले. जनता दलाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले प्रसिद्ध उद्योगपती विजय माल्या यांना मतदान करण्याशिवाय पक्षापुढे अन्य कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता.
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांना राजस्थानमधून निवडून आणण्यात भाजपाला यश मिळाले. याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री संतोष बागरोडीया यांना मैदानात उतरवून निवडणुकीत रंग भरण्याचा कॉंग्रेस पक्षाचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला. क्रॉस व्होटींग झाल्याने झारखंडमधील भाजपाचे उमेदवार अजय मारू यांना पुन्हा निवडणूक जिंकता आली नाही.

No comments: