मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी): सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट निर्माते तपन आचार्य यांच्या "जन्म' या चित्रपटाला नुकत्याच मुंबईतील प्रभादेवी येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके मराठी चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटासाठीचा द्वितीय दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला आहे. सामाजिक संदेशाबद्दलचा हा पुरस्कार आहे.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकाचवेळी दोन गोमंतकीय निर्मात्यांच्या चित्रपटांना दोन वेगवेगळ्या गटांत पुरस्कार लाभलेले आहेत. "हॅलो गंधे सर' हा गोमंतकीय निर्मात्याचा पुरस्कार लाभलेला दुसरा व्यावसायिक चित्रपट आहे.
या पुरस्कार हंगामात "जन्म' ला विविध गटांत लाभलेला हा पाचवा पुरस्कार आहे. त्यात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नवोदित निर्माता, कलादर्पणकडून उत्कृष्ट सामाजिक संदेशाबद्दलच्या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामुळे "जन्म'व्दारा निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच तपन आचार्य यांनी अगदी तरुण वयातच मान्यता मिळविली आहे.
या पुरस्काराने आपण भारावल्याचे व या वयात हा पुरस्कार मिळणे उत्साहवर्धक असल्याचे सांगून या पुरस्कारासाठी एरवी प्रचंड धडपडत करावी लागते; पण देवाच्या कृपेमुळे आपल्याला हा पुरस्कार मिळाला असून आपल्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे मान्यता मिळाली आहे, असे श्री. आचार्य म्हणाले.
Tuesday, 22 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment