Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 June 2010

काणकोणात जाग्या झाल्या 'त्या' काळ्याकुट्ट आठवणी!

काणकोण, (प्रतिनिधी): गेल्या २४ तासांत काणकोण तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आणि त्यामुळे गेल्या वर्षी गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर) झालेल्या प्रलयाच्या आठवणींनी सामान्य काणकोणवासी धास्तावला. तो दिवस जणू "काळरात्र' बनूनच आला होता. सामान्यांना त्या दिवसाने त्राही भगवान करून सोडले होते. किती जणांचे संसार तेव्हा उद्ध्वस्त झाले याला गणतीच नव्हती. कोणी कोणाला आधार द्यायचा, असा प्रश्न निर्माण झालेला. खोलवर गेलेल्या डोळ्यांना आसवे गाळण्याचेही अवसान उरलेले नव्हते. कोणा चिमुरडीचे पाटीदप्तर तर कोणाची बाहुली त्या पावसाच्या तडाख्यात कुठल्या कुठे वाहून गेली. सामान्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "मल्लिकार्जुनाने कृपा करावी आणि यंदा तशी वेळ आम्हा काणकोणवासीयांवर न येवो'.
दरम्यान, काल बरसलेल्या पावसामुळे तालुक्यात बहुतेक नदीनाले तुडुंब भरून वाहात आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वीज कर्मचाऱ्यांनी तो पुन्हा सुरळीत केला. किंदळे येथे आनंद कृष्णा देसाई यांच्या घराला लागून असलेल्या टेकडीचा काही भाग कोसळला. त्याचे मोठे दगड खाली आले. त्यामुळे देसाई यांच्या घराच्या पायऱ्या तुटल्या. सुदैवाने तेव्हा घरात कोणीही नव्हते. स्थानिक आमदार विजय पै खोत, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई, मामलेदार चंद्रकांत शेटकर यांनी या घटनेची पाहणी केली. पाटणे, श्रीस्थळ, लोलये आदी ठिकाणी वृक्ष वीजवाहिन्यांवर कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. नगर्से, तळे गावडोंगरी, सातोर्ली गावडोंगरी, गुळे श्रीस्थळ येथेही झाडे कोसळली. लोलये येथे दामोदर विद्यालयाजवळील संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. गालजीबाग येथे मातोश्री हॉटेलमध्ये पाणी घुसले. त्यामुळे तेथे एकच तारांबळ उडाली. तसेच मुलांनी भिजतच शाळा गाठली. मात्र काही शाळांनी पावसाचा एकूण रागरंग पाहून मुलांना सुखरुप घरी पोहोचवले. आज एकूण ८५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अजून दोन इंच पाऊस कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा २६ जूनपर्यंत ६५७.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. चापोली धरणातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

No comments: