श्रीलंकेला ८१ धावांनी दणका; दिनेश कार्तिक 'सामनावीर'
दांबुला, दि. २४ : तिखटजाळ गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांकडून मिळालेली तोलामोलाची साथ आणि त्यापूर्वी दिनेश कार्तिक (६६ धावा), रोहित शर्मा (४१ धावा) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (३८ धावा) या त्रिकुटाने फलंदाजीत बजावलेली झकास कामगिरी यांच्या जोरावर पाहुण्या भारताने तब्बल १५ वर्षांनंतर आशिया चषकावर दिमाखात आपला हक्क सांगितला. अर्धशतक टोलवलेला दिनेश कार्तिक या सामन्याचा मानकरी ठरला. आज येथे पार पडलेल्या अंतिम लढतीत धोनीच्या चमूने कुमार संगकाराच्या श्रीलंकीय संघाला ८१ धावांनी दणका दिला. भारतीय क्रिकेटरसिकांना त्यामुळे सुखद धक्का बसलाच आणि त्याचबरोबर भारताचा अंतिम फेरीतील विजयाचा दुष्काळही संपुष्टात आला. सध्या जरी सर्वत्र "वर्ल्डकप फुटबॉल फीव्हर' असला तरीसुद्धा देशभरात आणि गोव्यातसुद्धा वाड्यावाड्यावर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती ती भारताच्या अविस्मरणीय तथा विस्मयकारक विजयश्रीची...
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत २६८ धावा कुटल्या त्या अर्धा डझन फलंदाजांच्या मोबदल्यात. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना यजमानांना केवळ १८७ धावांत पांढरे निशाण उभारण्यास भाग पाडले. भारताकडून आशिष नेहरा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चौघांना तंबूचा रस्ता धरण्यास भाग पाडले. त्याला झहीर खान व रवींद्र जडेजा यांनी सुरेख साथ देताना प्रत्येकी दोन बळी मटकावले. प्रवीणकुमारने तिलकरत्न दिलशान याला पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवताना यजमानांच्या डावाला खिंडार पाडले. ऑस्ट्रेलियन पद्धतीने हरभजनसिंगने हा सोपा झेल आरामात टिपला. त्यानंतर ठरावीक अंतराने श्रीलंकेच्या गडी बाद होण्याचा सिलसिला सुरूच राहिला आणि भारताच्या गोटात आनंदाचे मेघ दाटून आले. चामरा कापुगेदरा (नाबाद ५५) व थिलिनी कंदम्बी (३१) यांनीच काय तो यजमानांकडून थोडाफार प्रतिकार केला. एरवी भारतीय गोलंदाजांनी अंतिम फेरीत कधी नव्हे एवढा अप्रतिम मारा केला. शिवाय जीव तोडून क्षेत्ररक्षण केले. त्याचे फळ त्यांना शानदार विजयाच्या रूपाने मिळाले. विजयानंतर धोनीने हा सामूहिक कामगिरीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले. श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने आपला संघ फलंदाजीत निष्प्रभ ठरल्याचे मान्य केले.
तत्पूर्वी, दिनेश कार्तिकच्या अर्धशतकामुळे भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६९ धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गौतम गंभीर आणि कार्तिकने सावध सुरवात केली. मात्र, १५ धावांवर असताना गंभीर चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहली आणि कार्तिकने अर्धशतकी भागिदारी करीत संघाचा डाव सावरला. कोहलीला कन्दम्बीने संगकाराकरवी धावबाद केल्यानंतर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. दिनेश कार्तिकही अर्धशतक झाल्यानंतर ६६ धावांवर बाद झाला. धोनीने ३८, रोहित शर्माने ४१ धावांची खेळी करीत संघाला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. शेवटच्या षटकांत भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता आल्याने भारताला श्रीलंकेसमोर २६९ धावांचे आव्हान ठेवता आले. श्रीलंकेकडून कन्दम्बी आणि मलिंगाने प्रत्येकी दोन, तर कुलशेखराने एक बळी मिळविला. मुरलीधरनने किफायतशीर गोलंदाजी करत दहा षटकात केवळ ३४ धावा दिल्या.
धावफलक
गौतम गंभीर धावबाद १५, दिनेश कार्तिक झे. जयवर्धने गो. कंदम्बी ६६,
विराट कोहली झे. संगकारा गो. मलिंगा २८, महेंद्रसिंग धोनी झे. कुलशेखरा गो. कन्दम्बी ३८, रोहित शर्मा झे. महारूफ गो. कुलशेखरा ४१, सुरेश रैना पायचीत गो. मलिंगा २९, रवींद्र जडेजा नाबाद २५, हरभजन सिंग नाबाद ७
एकूण: २६८/६ (५०.०) धावगती : ५.३६ अवांतर : १९ (बाइज - २, वाइड - ९, नो बॉल - १, लेग बाइज - ७)
गडी बाद होण्याचा क्रम : १-३८, २-१००, ३-१४६, ४-१६७, ५-२१७, ६-२४९
गोलंदाजी ः नुवान कुलशेखरा ९/०/४४/१, लसिथ मलिंगा १०/०/५७/२,
फरविझ महारूफ ६/०/४१/०, अँजलो मॅथ्यूज ३/१/१६/०, मुथय्या मुरलीधरन १०/०/३४/०, थिलिना कंदम्बी ७/०/३७/२, दिलशान ५/०/३०/०
श्रीलंका : उपुल तरंगा त्रि. गो. झहीर १६, दिलशान झे. हरभजन गो. प्रवीणकुमार ०,
कुमार संगकारा झे. झहीर गो. नेहरा १७, माहेला जयवर्धने झे. धोनी गो. नेहरा ११,
अँजलो मॅथ्यूज झे. धोनी गो. नेहरा ०, थिलिना कंदम्बी धावबाद (रैना) ३१, चामरा कापुगेदरा नाबाद ५५, फरवेझ महारूफ झे. धोनी गो. झहीर १०, नुवान कुलशेखरा यष्टिचित धोनी गो. जडेजा २०, लसिथ मलिंगा झे. रवींद्र जडेजा गो. नेहरा ७, मुथय्या मुरलीधरन झे. धोनी गो. जडेजा २
एकूण: १८७/१० (४४.४) धावगती : ४.१९ अवांतर : १८ (बाइज - ४, वाइड - ९, नो बॉल - २, लेग बाइज - ३)
गडी बाद होण्याचा क्रम : १-५, २-३१, ३-५०, ४-५०, ५-५१, ६-१०४, ७-१३२ , ८-१६८, ९-१७७, १०-१८७
गोलंदाजी : प्रवीणकुमार ९/१/२९/१, झहीर खान ८/२/३६/२, आशिष नेहरा ९/०/४०/४, हरभजन सिंग ९/०/३०/०, विराट कोहली ३/०/१६/०, रवींद्र जडेजा ६.४/०/२९/२
Friday, 25 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment