Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 June 2010

जसवंतसिंग स्वगृही परतले

नवी दिल्ली, दि. २४ : पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्यावर वादग्रस्त पुस्तक लिहिल्यानंतर भाजपमधून निष्कासित करण्यात आलेले वरिष्ठ नेते जसवंतसिंग यांनी आज पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
जसवंतसिंग भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. जसवंतसिंग यांच्या भाजप पुनर्प्रवेशाची घोषणा करण्याकरिता आज दुपारी राजधानीत एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जसवंतसिंग यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजदेखील उपस्थित होत्या.
संस्थापक सदस्य असलेल्या भाजपमध्ये पुन्हा परतण्यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जसवंतसिंग यांनी यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांना मनापासून धन्यवाद दिले. भाजपमध्ये परतल्यामुळे आपल्या कुटुंबात परतल्यासारखे वाटत आहे, असे ७२ वर्षीय जसवंतसिंग यांनी सांगितले.
जसवंतसिंग यांच्या भाजपमध्ये परतण्यामुळे आपल्याला मनापासून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया लालकृष्ण अडवाणी यांनी यावेळी व्यक्त केली. मी त्यांचे मनापासून पक्षात स्वागत करतो, असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
आजचा दिवस पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंददायक आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी जसवंतसिंग यांचे पक्षात पुन्हा स्वागत करताना सांगितले. भूतकाळातील सगळ्या गोष्टी विसरून जसवंतसिंग भाजपच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करतील. त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देताना मला अतिशय आनंद होत आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
आपल्या वादग्रस्त पुस्तकात जसवंतसिंग यांनी देशाच्या फाळणीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना जबाबदार धरले होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसवंतसिंग यांच्या पुस्तकावर गुजरातमध्ये बंदी घातली होती.

No comments: