Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 June 2010

संगणक शिक्षकांच्या राखीवतेचा घोळ संपला

अनुसूचित जमातीसाठी ९ व ओबीसींसाठी १५ पदे राखीव

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- शिक्षण खात्याकडून अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या संगणक शिक्षक भरती जाहिरातीत अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांच्या राखीवतेबाबत निर्माण झालेला घोळ अखेर दूर करण्यात आला आहे. खात्याने जाहीर केलेल्या ८० पदांत आता अनुसूचित जमातीसाठी ९ व इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) १५ पदे राखीव ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण खात्यातर्फे करण्यात आले आहे.
गेल्याच आठवड्यात शिक्षण खात्यातर्फे संगणक शिक्षकांची ८० पदे जाहीर करण्यात आली होती. या पदांत अनुसूचित जाती-८, अनुसूचित जमाती-६, इतर मागासवर्गीय९, सर्वसामान्य गट- ५८, अपंग-३ व स्वातंत्र्यसैनिकांची मुले-२ अशी राखीवता जाहीर केली होती. ही राखीवता सरकारच्या धोरणानुसार नसल्याचा आरोप करून याला गाकुवेध व इतर मागासवर्गीय संघटनांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. सरकारी धोरणानुसार अनुसूचित जमातीसाठी १२ टक्के राखीवतेप्रमाणे ९ जागा तर इतर मागासवर्गीयांसाठी १९ टक्के याप्रमाणे १५ जागा राखीव ठेवण्याची गरज असल्याचेही खात्याच्या लक्षात आणून देण्यात आले. दरम्यान, गेली पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीवर सेवेत असलेल्या ५६७ संगणक शिक्षकांना सरकारी सेवेत नियमित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याप्रमाणेच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा खुलासा खात्याकडून देण्यात आला. खात्याने केलेला खुलासा हा त्यांचा अंतर्गत मामला असला तरी राखीवतेसंबंधी धोरणानुसारच पदांची घोषणा व्हायला हवी, अशी मागणी जोर धरू लागल्याने अखेर शिक्षण खात्याने मुकाट्याने माघार घेऊन या पदांच्या राखीवतेत दुरुस्ती केली आहे. खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणात आता अनुसूचित जमातीसाठी ६ ऐवजी ९ व इतर मागासवर्गीयांसाठी ९ ऐवजी १५ पदांची घोषणा केली आहे. सर्वसामान्य गटातील पदांची संख्या ५८ वरून ४९ वर आली आहे.

No comments: