Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 24 June 2010

"दुदू'ला सजा, "अटाला'ची मजा

पोलिसांचा अजब न्याय

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- अमलीपदार्थ तस्करी करणारा इस्रायली ड्रग माफिया "दुदू' हा गोव्यात अनधिकृतपणे राहत असल्याने त्याला म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपयाचा दंड ठोठावली आहे; मात्र दुसरा ड्रग माफिया "अटाला' याच्याकडे अधिकृत व्हिसा नसल्याची माहिती गोवा पोलिसांना असूनही त्याला अटक केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अधिकृत व्हिसा नसलेल्या विदेशी लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण पोलिस खात्याकडून पुढे केले जात आहे. तसेच, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध केला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सध्या "दुदू' ड्रग प्रकरणात आग्वाद तुरुंगात आहे. "दुदू' याने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हणजूण, हरमल भागात अमलीपदार्थांचा जोरदार धंदा सुरू केला होता. "दुदू'ला २००६ साली भारत सोडण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाला न जुमानता त्याने हणजूण येथे दिमाखात एक बंगला घेऊन तेथे अमलीपदार्थांचा व्यवहार सुरू केला होता. "दुदू' अनधिकृतपणे गोव्यात राहत असल्याने हणजूण पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता. तर, दि. २३ फेब्रुवारी रोजी अमलीपदार्थविरोधी पथकाने अमलीपदार्थांसह त्याला अटक केली होती. "दुदू' हा काही पोलिस अधिकाऱ्यांसाठी "एटीएम मशीन' असल्याचेही अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या चौकशीत स्पष्ट झाले होते.
ड्रग प्रकरण व पोलिसांशी साटेलोटेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अटाला या ड्रगमाफियाची न्यायालयाने २२ रोजी पुराव्यांअभावी जामिनावर मुक्तता केली होती. वास्तविक त्याच्याकडे अधिकृत व्हिसा नसल्याने त्याला पुन्हा अटक होणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी व्हिसा नसताना अनधिकृत वास्तव्य करून असलेल्यांना ठेवण्यासाठी साधनसुविधा नसल्याचे कारण पुढे करून त्याला अटक करण्याचे टाळले आहे. एकाच प्रकारचा गुन्हा करणाऱ्या दोघा ड्रगमाफियांना पोलिस वेगळा न्याय देत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.

No comments: