Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 20 June 2010

अबकारी खात्यामधील १९ पदांसाठी ५ हजार अर्ज

लाखो रुपयांच्या बोलीची चर्चा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा मद्यार्क व्यवहारावरून संशयाच्या गर्तेत सापडलेले अबकारी खाते आता नव्या नोकरभरतीवरून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.अबकारी खात्यात अलीकडेच विविध अशी १९ पदे जाहीर करण्यात आली आहेत.या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत होती व त्यासाठी सुमारे ५ हजारांहून जास्त अर्ज सादर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.अबकारी उपनिरीक्षकांची केवळ दोन पदे जाहीर झाली असली तरी त्यासाठी लाखो रुपयांच्या "बोली' लावल्या जात असल्याची चर्चा उमेदवारांत सुरू आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असलेल्या अबकारी खात्यातर्फे अलीकडेच विविध अशी १९ पदांची घोषणा झाली आहे. अबकारी उपनिरीक्षक - २, अव्वल कारकून - १५ व निम्न कारकून -२ या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.या जाहिरातीत उपनिरीक्षक व निम्न कारकून पदांत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या पदांसाठी राज्यातील बेरोजगारांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. १८ जून ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती व त्यादिवशी सुमारे ५ हजारांहून जास्त अर्ज दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
उपनिरीक्षक पदांसाठी बारावीपर्यंतच्या शिक्षणाची आवश्यकता असल्याने विविध अर्जदारांनी सर्वच पदांना अर्ज केल्याने ही संख्या वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.यावेळी बहुतांश अर्ज हे सासष्टी व खास करून मडगाव परिसरातील बेरोजगारांकडून दाखल झाल्याचेही कळते.
या भरतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी काही उमेदवारांशी संपर्क साधला असता उपनिरीक्षकपदांसाठी १५ लाख रुपयांची बोली सुरू असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये सुरू आहे. ही बोली २० ते २५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. हे खाते सध्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे.
या खात्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोली लावण्याचा हा प्रकार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही संधी साधून काही मंडळी आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी पुढे सरसावल्याचीही चर्चा आहे. मुळात अबकारी उपनिरीक्षकांची केवळ दोनच पदे घोषित झाली असली तरी ही पदे वाढण्याची शक्यता असल्याने आपले नाव अंतिम निवड यादीत यावे यासाठी काही उमेदवारांनी "फिल्डिंग' लावली आहे. वाहतूक व अबकारी खात्यातील उपनिरीक्षक व निरीक्षकपदांसाठी मोठ्या प्रमाणात बोली लावल्या जातात व या पदांवर काम करणाऱ्यांना लाखो रुपयांची मिळकत असल्याची समजूत दृढ बनल्याचेही लक्षात लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.
अबकारी खात्यात कोट्यवधींचा जो घोटाळा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघड केला, त्यावरूनच या खात्यात कसा व्यवहार चालतो हे लक्षात येते.या घोटाळ्याची पाळेमुळे उच्चपदांपासून खालीपर्यंत सर्वत्र पसरल्याने त्याचा तपास केला जामे किंवा कुणावर कारवाई होणे कठीण असल्याचेही खुद्द खात्यातीलच अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर सरकारी नोकर भरती म्हणजे निव्वळ फार्स असून कोणत्या पदांवर कोणाची निवड होणार हे पूर्वीच निश्चित झाले असावे, अशी बेरोजगारांची धारणा बनली आहे. त्यामुळे त्यांना अर्ज दाखल करायला भाग पाडून त्यांची कशी थट्टा केली जाते, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

No comments: