Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 March 2011

भाषा माध्यम लढाईला धार्मिक रंग नको!

इंग्रजीकरणाच्या विरोधात ६ एप्रिल रोजी भव्य सभा
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
गोव्यातील काही इंग्रजीधार्जिण्या लोकांनी प्रादेशिक भाषांचे उच्चाटन करण्याच्या कटातून इंग्रजी माध्यमाची मागणी पुढे रेटली आहे. ही मागणी अनाठायी असून या कारस्थानाविरुद्ध ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ प्राणपणाने लढा देईल व या विषयी गोवाभर रान पेटवेल. काही विघटनवादी शक्ती या लढ्याला धार्मिक रंग देत असून या देशद्रोही शक्तींपासून दोन्ही धर्मीयांनी सावध राहावे, असे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी आज येथे बोलताना केले.
पणजी येथील गोमंतक मराठी समाजाच्या सभागृहात आयोजित स्थानिक भाषाप्रेमींच्या बैठकीत शशिकलाताई बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध लेखक पुंडलीक नायक, शिक्षणतज्ज्ञ प्रा. माधवराव कामत, भिकू पै आंगले, मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर, कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन. शिवदास, स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली, प्रा. सुभाष वेलिंगकर, प्रा. अनिल सामंत, दिलीप बोरकर, अरविंद भाटीकर, फादर ज्योजुईनो आल्मेदा, फादर मोऊजीयो द आताईद, प्रा. पांडुरंग नाडकर्णी, डॉ. नारायण देसाई, प्रा. सुभाष साळकर, प्रा. सुभाष देसाई, सीताराम टेंगसे. कांता पाटणेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतीयत्वावर घाला घालण्याचे षड्यंत्र ः प्रा. वेलिंगकर
देशात अशांतता माजवणार्‍या काही देशविघातक मंडळींनी गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या परधार्जिण्या मंडळींना गोव्याचे शैक्षणिक क्षेत्र उध्वस्त करून येथील देशी भाषा संपवायच्या आहेत. एकदा का गोव्यातील स्थानिक भाषा संपल्या की गोव्याला भारतीयत्वापासून तोडणे या मंडळींना सहज शक्य होईल. त्यासाठी संपूर्ण गोमंतकीयांनी जागृतपणे या कारस्थानाचा मुकाबला केला पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या वेळी केले.
भारतीय भाषांवरील सुनामी पळवून लावूया ः प्रा. कामत
गोव्यात सध्या भाषा माध्यमाबद्दल निर्माण झालेले वातावरण म्हणजे भारतीय भाषांवरील सुनामी असून ही सुनामी परतवून लावण्यासाठी व देशी भाषांच्या रक्षणासाठी सर्व गोवेकरांनी पुढे यावे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ प्रा. माधवराव कामत यांनी या वेळी केले. देशी भाषेपासून दुरावणार्‍या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व सामाजिक पतन होण्याची भीती असून अशी मुले पुढील काळात भारतापासून दुरावतील, असे ते म्हणाले.
वसाहतवादी वृत्ती ठेचून काढू ः प्रा. अनिल सामंत
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, नैतिक व शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण हे प्रादेशिक भाषेतूनच देण्याची गरज आहे, हा जागतिक सिद्धांत असताना काही मूठभर लोक इंग्रजी माध्यमाची मागणी करून गोव्यात वसाहतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रा. अनिल सामंत म्हणाले. आपल्या कर्तृत्वाने देशाला उत्तुंग शिखरावर नेणारे डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतूनच झाले होते यांची जाणीव या लोकांनी ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रहिताला प्राधान्य द्या ः फादर आताईद
गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यम आणून गोव्याला राष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची गरज असून काही परधार्जिण्या व्यक्तींनी आझाद मैदान भ्रष्ट केले, असे प्रतिपादन फादर मोऊजीनो आताईद यांनी व्यक्त केले.
इंग्रजीनंतर पोर्तुगीज भाषा येईल ः नागेश करमली
देशी भाषांना संपवणार्‍या इंग्रजीला गोव्यात रुजवल्यानंतर पोर्तुगीज भाषा व पोर्तुगिजांना गोव्यात आणण्याचा हा डाव असून हे कारस्थान सर्वांनी एकजुटीने उलथून टाकण्याची गरज यावेळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी व्यक्त केली
अल्पशिक्षित मंत्री शिक्षणाचे धोरण काय ठरविणार ः पुंडलीक नायक
साक्षर गोव्याला लाभलेले शिक्षणमंत्री हे अल्पशिक्षित आहेत व ते शिक्षणाचे माध्यम ठरवण्यास पुढे सरसावले आहेत हा मोठा विनोद आहे. जगात फक्त दहा टक्के लोक इंग्रजी शिकतात. देशी भाषा याच सर्वांगीण प्रगतीच्या स्रोत आहेत, असे मत पुंडलीक नायक यांनी मांडले. भिकू पै आंगले, पिलार सेमिनारीचे फादर ज्येजुईनो आल्मेदा, अरविंद भाटीकर आदींनी स्थानिक भाषेचे समर्थन करणारे विचार यावेळी व्यक्त केले.
प्रा. सुभाष देसाई यांनी पुढील योजनांबाबत माहिती दिली. वल्लभ केळकर यांनी सूत्रनिवेदन केले. या बैठकीला संपूर्ण गोव्यातून सुमारे ५०० प्रादेशिक भाषाप्रेमी उपस्थित होते.

६ एप्रिल रोजी भव्य सभा
दरम्यान दि.६ एप्रिल रोजी संध्या. ३.३० वाजता पणजी आझाद मैदानावर भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तालुकावार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दि. २८ मार्च रोजी म्हापसा, पर्वरी, मांद्रे, मडगाव, मुरगाव, व काणकोण; दि. २९ पणजी, डिचोेली, मये, वाळपई व फोंडा; दि. ३० कुंकळ्ळी, शिरोडा, बोरी, धारबांदोडा, साकोर्डा, कुळे, साखळी, पर्ये व पाळी. या बैठका संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होतील.

No comments: